श्री पांडुरंग साखर कारखान्यास तांत्रिक कार्यक्षमतेचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर

श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचा उच्चतम साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष व कारखान्याचे मार्गदर्शक सुधाकर परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतीपथावर असून कारखान्याचे चेअरमन दिनकरराव मोरे, मार्गदर्शक संचालक प्रशांत परिचारक यांच्या कुशल नेतृत्वाखाली कारखान्याने प्रगती साधली आहे. कारखान्याचे मुख्य सल्लागार के.एन. निबे यांच्या योग्य नियोजनामुळे कारखान्याने गाळप हंगाम सन २0१३-१४ मध्ये ८ लाख ८६ हजार मे. टन ऊसाचे गाळप करून ११.६५ च्या सरासरी साखर उतारा मिळवून १0 लाख ३६ हजार साखर पोत्याचे उत्पादन केले आहे. चालू गळीत हंगाम २0१४-१५ साठी १५ लाख ५0 हजार मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. २0१४-१५ च्या गाळप हंगामासाठी कारखान्यातील सर्व कामे पूर्ण झाली असून कारखान्याने तोडणी वाहतुकीचे अँडव्हान्स पेमेंटचे वाटपही केले आहे. तोडणी वाहतुक यंत्रणा सज्ज झाली आहे. सन २0१३-१४ च्या गाळप हंगामासाठी आलेल्या ऊसास जिल्ह्यात सर्वाधिक २ हजार ३२0 रूपये प्रतिटन प्रमाणे दर दिल्याने ऊस उत्पादक सभासदात आनंदाचे वातावरण असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर संघाचा उच्चतम साखर उतारा विभागातील तिसर्‍या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार नवी दिल्ली येथे केंद्रीय अन्न व ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांच्या हस्ते दि. १५ सप्टेंबर २0१४ रोजी देण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण समारंभास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष कल्लाप्पा आवाडे, उपाध्यक्ष अमित कोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी कारखान्याचे प्रोडक्शन मॅनेजर विलास निंबाळकर, चिफ इंजिनिअर आर.बी. पाटील, शेतकी अधिकारी आर.आर. साळुंखे, चिफ अकौंटंट शिरीष वागज, भीमराव बाबर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments