
गणेशोत्सवाच्या काळातच येणारे आणखी आनंदी आणि प्रसन्न दिवस म्हणजे महा लक्ष्मीचे दिवस . आता या दिवसाचं महत्व आणि आनंद हा दैवी असला तरी लहानपणी मात्र तो वेगळा होता . या निमित्ताने वर्षभर कपाटात बंद असणारी खेळणी बाहेर यायची याचाच तो आनंद असायचा .
शिवाय महा लक्ष्मीसाठी छत घातल्यामुळे आमचे घर वेगळे दिसायचे ते वेगळेच
.आमच्या घरच्या महालक्ष्मी या आमच्या भागात आकर्षणाचा विषय असायच्या तो त्या समोरच्या सजावटी आणि मांडणी मुळे . वर्षभर बंद असलेल्या कपाटातला खेळ या निमित्ताने बाहेर यायचा . जुन्या मित्रांची भेट व्हावी तसं मला व्हायचं . लाकडी , मातीची , प्लास्टिकची i अशी लहान मोठी खेळणी २ मोठाल्या कपाटातून बाहेर पडायची आणि मी भारावून जायचो . त्या खेळण्यांचा वर्षभर लपून राहिलेला गंध वातावरणात दरवळायला लागायचा . रात्री खूप उशिरा पर्यंत छत घालण्याचे , लक्ष्मी उभ्या करण्याचे आणि खेळ मांडण्याचे काम चालायचे . वर्ष भरातला हा माझ्यासाठीचा एकमेव दिवस असायचा ज्या दिवशी मी रात्री १२ वाजून गेले तरी जागा असायचो . (महाविद्यालयीन दिवसात अनेक रात्री जागून काढल्या तो भाग वेगळा ) सकाळी जाग आल्यानंतर घर वेगळंच दिसायला लागायचं . खूपच प्रसन्न वाटायचं . शाळांना अर्थातच सुट्ट्या असायच्या त्यामुळे दिवसभर लक्ष्मी पुढचा खेळ बघत बसण्यात आणि महालक्ष्मी बघायला आलेल्या मित्रांपुढे त्याचा मोठेपणा मिरवण्यातच दिवस जायचा .
गणपती , महालक्ष्मीच्या दिवसात घरासमोरचे अंगण झाडण्या पासून ते सडा टाकण्या पर्यंतची कामे मी अगदी उत्साहाने करायचो . आमच्या कडे तेंव्हा रांगोळीचा पितळी रूळ होता त्यात रांगोळी भरून तो रूळ मी घरा समोर फिरवायचो आणि आख्खा रस्ता भरून रांगोळी काढायचो . मग माझा तो रूळ मागून घेऊन गल्लीतले आणखी काही जण त्यांचे दार रांगोळीने भरून काढायचे . ( अर्थात त्यांना रूळ देण्याआधी त्यातली आमची रांगोळी काढून घ्यायला मी विसरायचो नाही ) . दुपारी चार वाजल्या पासून आमच्या गल्लीत सडा रांगोळ्या सुरु असायच्या . सार्वजनिक गणपती समोर स्पीकर वर प्रल्हाद शिंदे ची " बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा " किंवा लता मंगेशकरांची " गणराज रंगी नाचतो " सारखी गाणी वाजत असायची . ( तेंव्हाच्या गणेशोत्सवात हीच ठराविक गाणी वाजायची . हि गाणी आणि गणेशोत्सव असे जणू समीकरणच झाले होते . हि गाणी वर्षात इतर कधी जरी कानावर पडली तरी गणेशोत्सवाचा भास व्हायचं ) तेंव्हा डॉल्बीचा गोंधळ न्हवता . आणि गाण्यामधला मंजुळपणा संपलेला न्हवता . .
महालक्ष्मी बघायला गर्दी होते म्हणून आम्ही दारात जादा लाईट लावायचो . त्या उजेडात मग आम्हा गल्लीवाल्या मित्रांचे खेळ रंगायचे . घरच्यांनाही आमच्याकडे बघायला वेळ नसायचा . एकंदर सगळा आनंदी आनंद असायचा . .
महालक्ष्मी जायचा दिवस उजाडायचा . आज हा सगळा खेळ पुन्हा कपाटात जाणार , हि सगळी सजावट , हा आरास , हे छत काढले जाणार या विचाराने मन अस्वस्थ व्हायचे .मग मी घरच्यांना विनंती करायचो कि आणखी २ दिवस हे सगळं राहू द्या . मात्र प्रथा , परंपरेनुसार तसे करता येत नाही असे मला बजावले जायचे . मग दिवसभर तो आरास आणि ती खेळणी मी डोळे भरून बघून घ्यायचो . महालक्ष्मी उतरवताना आणि तो आरास काढताना मला जागावे वाटायचे नाही . मी झोप जायचो . सकाळी जाग आल्यावर बघायचो तेंव्हा कालचा तो आरास , ती सजावट , ती खेळणी या पैकी काहीच समोर नसायचे . सगळे कपाटात बंद झालेले असायचे . पुढच्या वर्षी परत बाहेर येण्याच्या बोलीवर . ..

0 Comments