पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर शहर व तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात परिचारक यांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या कुशल व व्यापक दुरदृष्टीच्या विचाराने पंढरपूरच्या शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले आहेत. त्यामुळे येणार्या काळात अध्यात्माची पंढरी शिक्षण क्षेत्रातही आपला वेगळा ठसा उमटवेल व ‘‘पंढरी पॅटर्न’’ म्हणून देशात वेगळी ओळख निर्माण करेल असे मत अजिंक्य क्रिडा मंडळाचे कार्याध्यक्ष मोहन यादव यांनी व्यक्त केले.
शिक्षण दिनाचे औचित्य साधून पंढरपूर येथे आयोजित कार्यक्रमात श्री.यादव बोलत होते, पुढे बोलतानाते म्हणाले की, या पंढरपूर शहर व तालुक्यात शिक्षणाची गरज ओळखून राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांनी विविध शैक्षणिक संस्थांची निर्मिती केली असून त्याचाच वसा व वारसा घेवून सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी उच्च व तंत्र शिक्षणासाठी परगावी जाणार्या सर्वसामान्य गरीब कुटूंबातील विद्यार्थ्यांची आर्थिक परवड थांबविण्याकरीता मौजे शेळवे येथील ओसाड माळरानावर इंजिनिअरींग व पॉलिटेक्नीक कॉलेजची निर्मिती करुन शिक्षणाची गंगोत्री पंढरीत आणली आहे. त्या माध्यमातून शेळवे कॉलेज येथे आज शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत असून पंढरपूर येथील उमा महाविद्यालय, उमा अध्यापक विद्यालय, उमा अध्यापक महाविद्यालय, सिध्दनाथ विद्यालय कासेगाव आदी संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाबरोबरच संस्कार देवून भावी पिढी सक्षम बनविण्याचे कार्य परिचारक यांनी केले आहे. शिक्षण क्षेत्राशी त्यांची नाळ जोडली गेली असून समाजातील उपेक्षीत घटकांना आधार देवून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणेकरीता ते मतिमंद व मुकबधीर विद्यालयही चालवित आहेत. या ठिकाणी कार्यरत असणार्या शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद आहे. शिक्षणामुळेच आदर्शवत समाज घडतो. त्यामुळे परिचारक यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करुन शैक्षणिक व सामाजिक विकास साधला असल्याने हे कार्य गौरवास्पद असल्याचे मत व्यक्त करुन प्रशांतराव परिचारक यांच्या अजिंक्य क्रिडा मंडळाच्या वतीने पंढरपूर-मंगळवेढा या भागातील सर्व गुरुजनांना व जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी राजेंद्र धोकडे, बाबुराव पावले, गजेंद्र पवार, जालिंदर शेलार, दिपक इरकल, दत्तात्रय खताळ, मुक बधिर व मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक कवडे, प्रा.तानाजी घाडगे, नितीन कांबळे, कैवल्य उत्पात, मनोज कणे, दिपक खंडागळे, अभय आराध्ये, तुषार मुळे आदी बहुसंख्य शिक्षक व नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक शेळवे कॉलेजचे क्रिडा शिक्षक प्रा.सुभाष मस्के यांनी केले व आभार कैलास खुळे यांनी मानले.
*****


0 Comments