पंढरपूर दि.03- पंढरपूर येथे येणा-या भाविकांची संख्या वाढत
आहे. त्यांना देण्यात येणा-या सुविधाही वाढल्या पाहिजेत. पंढरपूरचे प्रश्न व विविध
अडचणी सोडविण्यासाठी पंढरपूर येथे राज्य मंत्रीमंडळाची बैठक घेण्यासाठी आग्रह करणार
असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी केले. कार्तिकी एकादशी निमित्त श्री.विठ्ठल,
रुक्मिणीची शासकीय महापूजा त्यांनी सपत्नीक केली. या पुजेनंतर करण्यात आलेल्या
सत्कार सोहळया प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी त्यांच्या सुविद्या पत्नी मंदाकिनी
खडसे, मंदीर समिती अध्यक्ष आण्णा डांगे, आमदार सर्वश्री. सुरेश खाडे, राणा
जगजीतसिंह पाटील, दत्तात्रय सावंत, विभागीय आयुक्त विकास देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी , पोलिस अधिक्षक दत्तात्रय मंडलिक तसेच ना.खडसे यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, पंढरपूर येथील मंत्रीमंडळाच्या बैठकीत शहराच्या
समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य क्रमाने प्रयत्न केला जाईल व शहराच्या समस्या
निश्चित सुटतील अशी आशा व्यक्त केली.
तसेच पंढरपूर येथील चंद्रभागा प्रदुषण मुक्त करण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला
जाईल. चंद्रभागेमध्ये बारा महिने पाणी राहीले पाहीजे, पंढरपूर येथे भुयारी गटार
योजना आदी कामांच्यासाठी केंद्र शासनाकडे विशेष निधी मिळण्यासाठी आग्रह करणार
असल्याचे प्रतिपादन केले.
बा विठ्ठला! देशात महाराष्ट्र राज्य क्रमांक एकचे बनू दे.विकासाच्या बाबतीत हे
राज्य अग्रेसर रहावे त्याचबरोबर राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव असे साकडेही महसूल
मंत्री एकनाथ खडसे यांनी यावेळी श्री.विठ्ठल चरणी घातले.
यावेळी माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी खा. शिवाजी बापू कांबळे, माजी आ.
उल्लासदादा पवार, प्रांतधिकारी संजय तेली, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश जाधव, तहसिलदार
गजानन गुरव, मंदीर समिती सदस्य सर्वश्री वसंत पाटील, प्रा.जयंत भंडारे, मंदीर समितीचे व्यवस्थापक श्री. महाजन यांच्यासह
विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
0000

0 Comments