प्रासंगीक
श्याम सावजी यांच्या लेखणीतून....
पंढरपूर लाईव्ह
अगदी कळत्या वयापासून हा हनुमान जयंती निमित्त पंढरपुरातून निघणारा व्यापारी कमेटीचा छबिना मी बघत आलो आहे . अगदी लहानपणी आज्जीचे बोट धरून मी हा छबिना बघायला जायचो. हनुमान जयंतीच्या दुसर्या दिवशी संध्याकाळी हि छबिन्याची मिरवणूक निघते . समस्त पंढरपूरकर हि मिरवणूक बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे असतात . काही प्लास्टरच्या मूर्ती आणि सर्वात शेवटी रथात असणारी पंढरपूरच्या व्यापारी कमेटीच्या मारुतीची उत्सव मूर्ती असे या छबिन्याच्या मिरवणुकीचे स्वरूप असते .
सर्वात पुढे कंबरेवर हात ठेवून विजयी मुद्रेत उभा असलेला पैलवान, अंगात मलमलचा सदरा, त्याच्या बाह्या कोपरापर्यंत सावरलेल्या , कंबरेला लुंगी , डोक्याला तुरेबाज फेटा आणि ओठांवर पाचुन्दाभर मिश्या, वर उचलेल्या हातात मानाचे कडे अशी हि पैलवानाची मूर्ती छबिन्याच्या अग्रभागी असायची जिला बघताच " वारे गब्रू " असा उद्गार तोंडातून निघायलाच हवा . त्यानंतर झूल पांघरलेला हत्ती , मग एक मोठ्ठा मोर त्यानंतर घोड्यावर मांड ठोकून बसलेले छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर घोड्यावरच बसलेले दोन मावळे ( आम्ही लहानपणी यांना तानाजी , संताजी , धनाजी म्हणायचो ) असा हा छबिन्याचा फौज फाटा . मावळतीच्या उन्हात या मूर्ती त्यांच्या साठी खास तयार केलेल्या कमी उंचीच्या बैल गाडीत चढवून पंढरपुरातील नव्या पेठेत आणून मारुती मंदिरासमोर उभ्या केल्या जायच्या . हा सगळा परिसर पंढरपूरच्या व्यापार्यांनी आणि आमच्या सारख्या रसिकांनी भरून गेलेला असायचा . मारुतीची उत्सव मूर्ती रथात बसवली कि हा छबिना मार्गस्थ व्हायचा .
प्रत्येक मूर्ती समोर पंढरपुरातील घडशी समाजाच्या मंडळींचा स्वतंत्र ब्यांड असायचा . लेझीमही असायची मी लहानपणी हा छबिना बघायचो तेंव्हा प्रत्येक मूर्ती समोर ग्यास बत्त्या असायच्या . त्या उजेडात या मूर्ती जास्तच भव्य वाटायच्या . आता प्रखर झकपक लाईटचे दिवे संपूर्ण मिरवणुकीत असतात . फटाक्यांची आतषबाजी सुरु असायची . पंढरपुरातील प्रदक्षिणा मार्गाने फिरत रात्री उशिरा या छबिन्याची सांगता व्हायची . माझ्या पंढरपूरच्या आठवणीमधील ह्या छबिन्याची आठवण हा खूप आनंदाचा ठेवा आहे….. तर मग जाणार ना मित्रानो आज संध्याकाळी पंढरपूरचा हा हनुमान जयंती निमित्त निघणारा देखणा छबिना सोहळा बघायला?








0 Comments