पंढरपूर (प्रतिनिधी) :- दि. 26 ऑक्टोबर 2015
कायदा व सुव्यवस्था अबाधित रहाण्यासाठी यापुढे पोलिस व जनतेने हातात हात घालून सकारात्मक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नावंदेसाो यांनी व्यक्त केले. येथील लिंकरोड नजीकच्या नागालॅन्ड मागील सिंघण हॉल मध्ये पोलिस मित्र संकल्पनेबाबत माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी उपनगरातील नागरिकांशी सुसंवाद साधत नागरिकांच्या वेगवेगळ्या समस्यांबाबतच्या प्रश्नांना सखोल उत्तरे दिली. पोलिस मित्र संकल्पनेबाबत माहिती देण्यासाठी व उपनगरातील नागरिकांशी पोलिस अधिकार्यांचा सुसंवाद होऊन येथील नागरिकांच्या समस्या पोलिसांना कळाव्यात व पोलिसांच्याही कांही अडचणी नागरिकांनी समजून घ्याव्यात यासाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश सिंघण, माहिती अधिकार कार्यकर्ते यशवंत डोंबाळी (सर) व पत्रकार भगवान वानखेडे यांनी दि.25 ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास पोलिस निरीक्षक अशोक चंद्रकांत देशमुख हे सुध्दा आवर्जुन उपस्थित होते. 
पुढे बोलताना श्री.नावंदे म्हणाले की, ‘‘समाजातील अनिष्ट घटकांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांना कार्य करताना स्थानिक नागरिकांचीही आवश्यक तेथे मदत मिळावी यासाठी ‘पोलिस मित्र’ ही संकल्पना आहे. पोलिस हा सुध्दा समाजाचाच एक घटक आहे. समाजात वावरताना यालाही कांही अडचणी येत असतात. पोलिसांसह समाजातील सर्व घटकांना सोबत घेवून संपुर्ण महाराष्ट्रात पोलिस मित्र ही संकल्पना राबविण्यात येत आहे. यासाठी आम्ही शहरातील विविध भागात नागरिक बोलावतील तेथे येवू आपल्या भागातील कांही सजग तरुणांनी पोलिस मित्र म्हणून कार्य करण्यासाठी पुढे यावे. रात्रीच्यावेळी जेंव्हा पोलिस आपल्या भागात येतील तेंव्हा त्यांचेसोबत कांही तास फिरावे. आपल्या परिसराच्या जास्त लांब नाही तर आपल्याच भागात हे कार्य करायचे आहे. ज्या भागातील नागरिक जागृत आहेत असे गुन्हेगारांना कळते, त्या भागातील गुन्हे आपोआपच कमी होत असतात. या भागातील नागरिक सजग आहेत, तात्काळ पोलसांना पाचारण करतात, रात्री जागे असतात असे जेंव्हा चोरांना माहिती होते तेंव्हा त्या भागात चोरटे फिरकण्याचे धाडस करत नाहीत.’’
पंढरपूर शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी आहे. मात्र नागरिकांना सेवा देण्याचे आमचे कर्तव्य आहे. यासाठी पोलिस मित्र म्हणून आपणही सहकार्य करावे. आपल्या भागात कधी कोणता अनुचित प्रकार घडल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. एखादा गुन्हा करुन कोणी पलायन करताना आढळला तर तात्काळ त्याच्या गाडीचा क्रमांक घ्या म्हणजे आम्हाला तो ट्रेस करता येतो. सुदैवाने पंढरपूर शहरात खुप सार्या संघटना आहेत. या संघटनांच्या माध्यमातून आमच्याकडे अनेक प्रकारची निवेदने येतात याचा पाठपुरावा आम्ही वेळोवेळी करतोच. अशा संघटनातील कांही तरुणांनीही पोलिस मित्र बनुन आम्हाला सहकार्य करावे. आपापल्या भागातील घडलेल्या गुन्ह्ययांच्या घटना आमच्यापेक्षा आपणास तात्काळ कळतात. अशा कांही घटना घडल्यास आम्हाला तात्काळ कळवा. अनुचित घटना घडल्यास लगेच त्याचा फोटो काढा आम्हाला पाठवा. पंढरपूर रेल्वे स्टेशन परिसरातील गस्त वाढविलेली आहेच. त्यामध्ये आणखी वाढ करु.
एकुणच पोलिस मित्र या नात्याने एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण व्हावी, एकमेकांना सहकार्य करावे हे अपेक्षीत आहे. चांगल्या माणसांना आम्ही कधीच वाईट वागणुक देत नाही. तेंव्हा नि:संकोचपणे कधीही आमच्याशी संपर्क साधा. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपापल्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. जमले तर किमान आपापल्या सोसायटीत तरी महत्वाच्या ठिकाणी नागरिकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवुन घ्यावेत. नगरपालिकेला ही शहरातील सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याच्या सुचना आम्ही केलेल्या आहेत. मुलींच्या छेडछाडीचे प्रकाराबाबतच्या गुन्ह्यात आरोपींची कधीच गय केली जाणार नाही. कुठे अशा प्रकारे घटना घडत असेल तर तात्काळ आम्हाला कळवा अशांवर कठोर कारवाई करु.
यावेळी उपस्थित कांही जागृत नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी बोलताना सिध्दांत कदम म्हणाले की, रोडरोमिओंचा त्रास सध्या उपनगरात खुप वाढलेला आहे. भरधाव वेगात गाड्या पळविणे क्लासेस बाहेर थांबून मुलींची छेड काढणे याबाबत उपाययोजना कराव्यात.
माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर म्हणाले की, येथील नविन कराड नाका ते केबीपी चौक हा रहदारीच्या दृष्टीने नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत असून येथे वारंवार होणार्या अपघाताबाबत तात्काळ उपाययोजना होणे आवश्यक आहे.
लिंकरोडवर कांही ठिकाणी वटलेली झाडे आहेत. या झाडांचा वाहतुकीला अडथळा येतो तरी अशी झाडे तात्काळ काढावीत अशी सुचना राजेंद्र भोसले (सर) यांनी व्यक्त केली.
अॅड. संग्राम अभ्यंकर म्हणाले की, पोलिस स्टेशनमध्ये गेल्यानंतर सर्व कामे होतात. तिथे जाणे गरजेचे आहे. पोलिस मित्र संकल्पनेसाठी आमच्या मनिषा नगर भागातून जेजे सहकार्य अपेक्षीत आहे ते ते सर्व करु.
विनोद भरते सर म्हणाले की, पोलिस मित्र संकल्पनेसाठी नागालॅन्ड परिसरातील तरुणांनी पुढे यावे. वेगवेगळ्या संघटनांनीही आपला सहभाग नोंदवावा. इसबावी येथील विसावा मंदिर ते के.बी.पी. चौक पर्यंत सलग डिव्हायडर बसवावा अशी सुचनाही यांनी केली.
सिध्देश्वर कोरे म्हणाले येथील रेल्वे स्टेशनवर उपनगरातील अनेक जेष्ठ नागरिक रात्रीच्या वेळी फिरावयास जातात. त्यांना कांही गुंड तरुण पैशासाठी अडवतात. मागे एका जेष्ठ नागरिकाला पैशासाठी चाकुने भोसकण्यात आल्याची गंभीर घटना घडली होती. असे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांची या भागातील रात्रीची गस्त वाढविणे आवश्यक आहे.
प्रद्युमन सावंत सर म्हणाले की, आमचे कुटंबातील दोन नातेवाईकांचे मोठे अपघात लिंकरोडवर झाले. यामध्ये मागील 13 आॉक्टोबर रोजी ज्ञानेश्वर पवार या नातेवाईकाचे अपघाती निधन झाले. या रस्त्याचा अवजड वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. वाहतुक व्यवस्था सुरळीत करावी.
यावेळी बोलताना पत्रकार संपादक संजय वाईकर म्हणाले की, श्री.नावंदे यांनी नगरिकांशी संवाद साधण्यासाठीच्या या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून प्रशंसनीय कार्य केले आहे. संयोजक भगवान वानखेडे व गणेश सिंघण, यशवंत डोंबाळी सरांनी अतिशय चांगला कार्यक्रम घेतला जेणेकरुन येथील नागरिकांना थेट पोलिस अधिकार्यांशी संवाद साधणे शक्य झाले. सध्या ऑक्टोबर महिना चालु आहे, लहान मोठ्या चोर्यांचे प्रमाण वाढलेले आहे. पुढील काळात हे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे. यासाठी पंढरपूर शहरातील तरुणांनी व विविध संघटनांच्या पदाधिकार्यांनी पोलिस मित्र बनुन पोलिसांना सहकार्य करणे अत्यावश्यक आहे. पंढरपूर शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या मानाने येथील पोलिसांची संख्या कमी प्रमाणात आहे. प्रयेक नागरिकाने आपटापल्या घरातील मंडळींकडे पोलिस अधिकार्यांचे व पोलिस ठाण्याचे संपर्क क्रमांक द्यावेत. आपापल्या घरातील विजेचे दिवे रात्री चालु ठेवावेत. पुढचा काळ भयानक आहे. वेगवेगळी गणेश मंडळे आहेत त्यातील तरुणांनी पोलिस मित्र बनावे. आपापल्या भागात गस्त करावी. पंढरपूरकर नेहमीच चांगल्या अधिकार्यांना डोक्यावर घेतात हा इतिहास आहे. पंढरपूरची जनता वाईट नाही. आजही येथे येवून गेलेल्या कांही चांगल्या अधिकार्यांच्या कामाबाबतची चर्चा येथे होते. श्री.नावंदे हे सुध्दा चांगले अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांना पोलिस मित्र म्हणून नागरिकांनी व तरुणांनी सहकार्य करावे. अनेक क्लासेस च्या बाहेर कांही ठराविक तरुण मुलींची छेडछाड करतात. मोबाईलमध्ये मुलचिे फोटो काढून घेतात अशा तरुणांना पोलिसी खाक्या दाखवणे गरजेचे आहे. कॉलज चौक ते प्रबोधनकार ठाकरे चौक येथे आवश्यक त्या ठिकाणी डिव्हायडर व गतीरोधक बसविणे आवश्यक आहे. अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी पोलिस जातातच मात्र अपघातच होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. या कार्यासाठी आपल्या वरीष्ठांना पत्रकार या नात्याने येथील समस्या कळवु. रात्रीच्या वेळी राऊंड करताना आपल्या पोलिसांना सहकार्य करण्यासाठी उपनगरातील तरुण नक्कीच सहकार्य करतील. पंढरपूर हे अध्यात्मीक शहर आहे. त्याची ओळख गुन्हेगारी शहर होऊ नये यासाठी पोलिस व नागरिक या दोघांनी समन्वयाने पुढे येणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री.वाईकर यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करताना खादी ग्रामोद्योग चे संचालक गणेश सिंघण म्हणाले की, नावंदेसाहेब आल्यापासून पंढरपूरमधील गुन्ह्यांच्या घटनांना पायबंद बसलेला आहे. गुन्हेगारांवर त्यांचा चांगलाच वचक आहे. नागरिकांनी आपापल्या भागातील समस्या त्यांचेपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. पोलिस मित्र ही संकल्पना उपनगरातील नागरिकांना समजावी, नागरिकांचा व पोलिसांचा सुसंवाद व्हावा यासाठी हे चर्चासत्र घेण्यात येत आहे. यावेळी यशवंत डोंबाळी सर यांचे हस्ते श्री.नावंदे यांचा सत्कार करण्यात आला. तर आभार भगवान वानखेडे यांनी मानले.
या कार्यक्रमास चांगदेव धुमाळ, माजी नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, पत्रकार संजय कोकरे, प्रदिप पांढरे (सर), आनंद भोसले, संदीप जगताप, अनिल नलवडे, श्रीकांत तोडकरी, कैलास स्वामी, सुहास गोरे, भाऊसिंग गावीत, जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य व उपनगरातील अनेक सजग नागरिक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होणेसाठी गणेश सिंघण व भगवान वानखेडे यांनी परिश्रम घेतले.







0 Comments