पंढरपुरातील एकमुखी विप्र दत्त

|| श्री ||
पंढरपुरातील एकमुखी विप्र दत्त
दत्त म्हटल्यावर त्रिकाल ज्ञानाचे दर्शन घडवणारी तीन तोंडे असणारच असा आपला समज . पण काही ठिकाणी एक मुखी दत्त मूर्ती सुद्धा आहेत . अशीच एक मूर्ती पंढरपुरातील विप्र दत्त मंदिरात आहे. शाळीग्राम पासून बनलेली हि मूर्ती स्वयंभू असल्याचे सांगण्यात येते . मूर्तीला संत परंपरेप्रमाणे रोज फेटा बांधण्यात येतो .मूर्ती एकमुखी असली तरी मूर्तीला सहा हात आहेत . पंढरपूरच्या आग्नेयेला चंद्रभागेच्या काठावर विप्र कुटुंबियांच्या जुन्या पद्धतीच्या वाड्यात हे दत्त मंदिर आहे . विप्र कुटुंबियांचे पूर्वज बापुसो विप्र यांना स्वप्नात दृष्टांत झाल्याप्रमाणे त्यांना कोरेगाव तालुक्यात कृष्णा नदीच्या डोहात हि दत्त मूर्ती मिळाली. रास्ते या संस्थानिकांनी विप्रांना मठाच्या स्थापनेसाठी जागा दिली . बापुसो विप्रांची समाधी या वाड्यातच आहे. तुका विप्र हे विप्र कुटुंबियांचे मूळ पुरुष सांगितले जातात . संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या शतकोटी अभंगाच्या संकल्पनेतील राहिलेले ७२० अभंग तुका विप्रांनी पूर्ण केल्याचे आणि त्याचे " शतकोटीचा शेवट " हे पुस्तक लौकरच प्रसिद्ध होणार असल्याचं श्री भास्कर विठ्ठल बुवा विप्र यांनी सांगितले . तुका विप्र यांचे हस्ताक्षरातील लेखन मंदिरात बघायला मिळते . !! दत्त जनार्धन एकनाथ . विप्रस्वामी सद्गुरुनाथ !! अशी या विप्र घराण्याची गुरु परंपरा आहे.
दत्त जयंती निमित्त विप्र वाड्यात १० दिवस भजन , कीर्तन , प्रवचन , दत्त गीते गायन असे कार्यक्रम चालतात . यंदा सुद्धा १८ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत असे कार्यक्रम मंदिरात सुरु आहेत. आज जयंती निमित्त मनोहर उत्पात यांचे कीर्तन सकाळी १० ते १२ या कालावधीत होईल आणि दुपारी १२ वाजता जन्म सोहळा संपन्न होईल .शुक्रवार दिनांक २५ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत महाप्रसाद देण्यात येईल असे भास्कर विठ्ठलबुवा विप्र यांनी सांगितले. त्यांच्या बरोबरच मोहन आणि राजू विप्र हे बंधू दत्त महाराजांच्या सेवे साठी कार्यरत आहेत . विप्र कुटुंबियांची ७ वि पिढी सध्या मंदिरात सेवा बजावत आहे. .. दत्त जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा !..... श्याम सावजी .... पंढरपूर

Post a Comment

0 Comments