नदीकाठच्या वाळवा तालुक्‍यातही पाणीटंचाई

नदीकाठच्या वाळवा तालुक्‍यातही पाणीटंचाई
इस्लामपूर - वाळवा तालुक्‍यातील अनेक गावे उन्हाच्या तीव्र झळा आणि पाणीटंचाईने होरपळत आहेत. कृष्णा व वारणा नद्यांचा परिसर असूनही पाण्याच्या नियोजनाअभावी टंचाईजन्य स्थिती निर्माण झालीय. काही ठिकाणी टॅंकर तर बहुतांशी गावांना राजारामबापू पाटील साखर कारखान्याच्या व अन्य पाणीपुरवठा योजनांची साथ उपयोगाला आली आहे. दोन ते तीन दिवसांतून पाणी मिळत आहे.

शासनाने गाताडवाडी, वाघवाडी, जांभूळवाडी, शिवपुरी, मरळनाथपूर, पेठ, ओझर्डे व सुरूल, ढगेवाडी, रेठरे धरण, जक्राईवाडी, ऐतवडे बुद्रुक, कारंदवाडी ही गावे टंचाई आराखड्यात समाविष्ट केली आहेत. ओझर्डेत दलित समाजासाठी वाटेगाव येथून टॅंकरने पाणी पुरवले जाते. प्रशासन व सत्ताधारी निष्क्रिय असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे. शेजारील गोळेवाडी रस्त्यावरील टी वरून पाण्याचे कॅन भरून आणले जाते. गावात नव्याने दोन कूपनलिका मारल्या आहेत. मरळनाथपूर येथे शासनाकडून दिवसभरात तीन टॅंकर पाणी दिले जाते.

गावात पेयजलची टाकी आहे. विहिरीत ओतलेले पाणी शुद्धीकरण करून पुरवले जाते. माळवाडी व धुमाळवाडी येथेही याच योजनेतून पाणी पुरवले जाते. प्रत्येकाला एक दिवस या न्यायाने तीन दिवसांतून एकदा पाणी मिळते. रेठरेधरण येथील तलाव पूर्णपणे आटला आहे. पेठ, वाघवाडी गावांना एक आड एक दिवस पाणी पुरवले जाते.

सुरूल येथे तलाव व विहिरीचे पाणी आटले आहे. वाटेगाव संयुक्त योजनेतून पाइपने पाणी गावविहिरीत सोडलेय. पंचायत समितीने ओझर्डे, ऐतवडे बुद्रुक, सुरूल येथील बोट व विहिरींचे अधिग्रहण केले आहे. महादेववाडी, माणिकवाडी, घबकवाडी, सुरूल या गावांना वाटेगाव योजनेतून पाणी पुरवले जात आहे. इटकरे, भाटवाडी, ढवळी येथील गावांनाही त्या त्या योजना पाणी देत आहेत. जवळपास २५ गावांना राजारामबापू साखर कारखान्याच्या पाणी योजनांनी पाणी दिले आहे.

पाणी योजनांचे नियोजन नसल्याने गाव ना घरका ना घाटका अवस्थेत आहे. आमदार शिराळा पेठेचा आणि पंचायत समिती वाळव्याची अशी अवस्था झाल्याने आम्ही हेलपाटत आहोत. पाण्याचे नियोजन टंचाई विचारात घेऊन आधीच व्हायला हवे.
- अंतू महाडिक, सुरूल

दिवसभर टॅंकरची वाट पाहणे हीच गरज बनलीय. टॅंकर आला  तर ठीक, नाही तर आड, विहीर शोधून मिळेल तेथून पाणी आणण्याचा खटाटोप करावा लागतो.
- अमित खोत, मरळनाथपूर. (अभियांत्रिकीचा विद्यार्थी)

नदीकाठ असूनही पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. सरपंच, ग्रामसेवक, तलाठी यांचे संयुक्त प्रस्ताव आल्यास टॅंकर देण्याची व्यवस्था करू.
- विजयसिंह जाधव, गटविकास अधिकारी.

Post a Comment

0 Comments