*प्रतिरूप*

*प्रतिरूप*

नऊ महिने नऊ दिवस
बाळाचं आणि तिचं अस्तित्व
एक श्वास एक लय
रक्तामांसाने सिंचत रहाते ती
स्वत:चंच प्रतिरूप..
असह्य मरणकळा सोसल्यानंतर
पाहते ती
दुपट्ट्यात गुंडाळलेला
मांसाचा गोळा
तेव्हा
भान हरपून जगू लागते ती..
तो मोठा होत जातो
ती मात्र
जोडलेलीच रहाते
तुटलेल्या नाळेसह..
अंगाखांद्यावर घोळवत रहाते
दुपट्टयांचा ..बेबी ऑईलचा वास..
कोणतीही केशभुषा मिरवत असला तो
तरीही
ती मात्र
जावळातूनच हात फिरवत रहाते..
तो नऊ महिन्यांचा अलौकिक काळ
तेच जीणं खरं तीचं..
ती सिंचत जाते एक रोपटं..
थरथरत्या हातांनी चेह-यावरुन
फिरवत रहाते
काळीजमाया
आणि
एके दिवशी
त्याच झाडाजवळच्या मातीत
मिटत जाते ती
त्याच झाडाला नव्याने
खतपाणी देण्यासाठी..!!

     *ज्योती कदम*
       नांदेड
      (९६०४४६६६९६)

Post a Comment

0 Comments