कर्जमाफी दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता
मुंबई, दि. 6 : केवळ कर्जमाफीवर न थांबता शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी विविध उपाययोजना राबविण्याबरोबरच कृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यावर भर दिला जात आहे. राज्यातील जनतेचे आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या निश्चितपणे दूर करू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
शेतकऱ्यांना दिलासा देणारी कर्जमाफी जाहीर केल्याबद्दल राज्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांतून आलेल्या सुमारे सत्तर शेतकऱ्यांनी आज वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी ते बोलत होते.
श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य स्थापन केले होते. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन शेतकऱ्यांसाठी हितकारक निर्णय घेण्यात येत आहेत. इतर राज्यांनी लावलेले निकष न लावता सरसकट कर्जमाफी देऊन एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. याचा फायदा 36 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. राज्यातील 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा प्रयत्न चालू आहे. याशिवाय दुष्काळाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना, अनुदान यासारख्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीबरोबरच शेतमालाला हमीभाव आणि बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
यावेळी जालना जिल्ह्यातील केशव मदन या शेतकऱ्याने 20 वर्षांत पहिल्यांदा शेतमालाला योग्य भाव मिळाला आहे, असे सांगितले. या ऐतिहासिक निर्णयाचा तरुण शेतकऱ्यांना विशेष फायदा होईल, असे औरंगाबाद येथील कैलास निकम म्हणाले तर हिंगोली येथील एकनाथ जगताप या ज्येष्ठ शेतकऱ्याने गावात फटाके फोडून आनंद साजरा केला असे सांगितले. याशिवाय बीड येथील दत्ता जाधव, नांदेड येथील आत्माराम पाटील, लातूर येथील मारुती घोणसे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. जिंतूर तालुक्यातील वयोवृद्ध शेतकरी अश्रुबा सांगळे यांनी मुख्यमंत्र्यांना खास शेतकऱ्यासारखा पटका बांधला.
यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार रावसाहेब दानवे, आमदार सर्वश्री सुरजितसिंह ठाकूर, प्रशांत बंब, नारायण कुचे, तानाजी मुटकुळे, यांच्यासह शिरीष बोराळकर, दिलीप थोरात, विकास कुलकर्णी यांच्यासह इतर शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या पाठीशी रहाल ही अपेक्षा!
या भेटीच्या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी मा. मुख्यमंत्री यांना शेतकऱ्यांच्या श्रमाची साथीदार असलेली बैलगाडीची प्रतिकृती भेट दिली. तसेच मुख्यमंत्र्यांना भावपूर्ण पत्र आठवण म्हणून भेट दिले. या पत्रात त्यांनी लिहिले आहे की, ‘तुम्ही नुसती कर्जमाफी जाहीर केली नाही, ती योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचली पाहिजे याची काळजी घेतली. आजपर्यंत कर्जमाफी देताना जिल्हावार शेतकऱ्यांची आकडेवारी जाहीर करणारे पहिले मुख्यमंत्री पाहिले आम्ही. 36 लाख दहा हजार 216 शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे असं नेमकं सांगण्यासाठी पारदर्शकता लागते. ती तुमच्यात आहे हे तुम्ही दाखवून दिलं.
तुमचे असे शेतकरी हिताचे निर्णय पाहून असं वाटतं की, तुमच्या विश्वासावर आम्ही शेतीत आणखी धाडसाने नवे प्रयोग करु शकतो. इथून पुढेही असेच शेतकऱ्यांच्या पाठीशी रहाल, ही अपेक्षा आहे’.
|













0 Comments