मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावला याचा आम्हाला निश्‍चितच आनंद आहे... पण सरकार, छत्रपतींच्या वंशजांना न्याय दिलात मग आम्ही मावळ्यांच्या वंशजांनी काय बिघडवलंय वो!- गणेश अंकुशराव

पंढरपूर LIVE 1 डिसेंबर 2018


पंढरपूर (प्रतिनिधी) ः- ‘‘सरकार, छत्रपतींच्या वंशजांना आरक्षण देऊन न्याय दिलात याबद्दल आनंदचय; पण आम्ही मावळ्यांच्या वंशजांनी काय बिघडवलंय वो!’’ अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधुन आपल्या मनातील खदखद व्यक्त करण्याचा प्रयत्न एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केला आहे.
गेल्या अनेक वर्षापासुनचा मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गी लावला याचा आम्हाला निश्‍चितच आनंद असून छत्रपतींच्या वंशजांना न्याय मिळवुन दिल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांचे आम्ही अभिनंदनही करतो. परंतु गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही छत्रपतींच्या मावळ्यांच्या वंशजांना म्हणजेच कोळी जमात बांधवांना जातीचे दाखले मिळण्याबाबत आजही अडथळे निर्माण होताना आढळताहेत. मग मावळ्यांचे वंशज असलेल्या कोळी जमात बांधवांनी कुणाचे काय बिघडवले की काय? असा प्रश्‍न निर्माण होतो. 
आम्ही वर्षानुवर्षे  केलेल्या अनेक आंदोलनानंतर महादेव कोळी जमातीच्या बांधवांना जातीचे दाखले देण्याचा मार्ग भाजपा सरकारने खुला केला, 85 जणांना जातीचे दाखलेही दिले गेले; परंतु यानंतर प्रशासनाच्या उदासीनतेमुळे कोळी जमात बांधवांना जातीचे दाखले वेळेत मिळत नाही. महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीच्या बांधवांवर हा खुप मोठा अन्याय आहे.
गेल्या कित्येक पिढ्यानपिढ्या आदिवासी महादेव कोळी जमात बांधवांचा जातीच्या दाखल्यांसाठीचा लढा चालु होता. परंतु महर्षी वाल्मिकी संघाने अनेक वर्ष सातत्याने विविध प्रकारची आंदोलनं करुन, मुख्यमंत्र्यांना वारंवार निवेदने देऊन कोळी जमात बांधवांना न्याय मिळवून दिला आहे. तब्बल 85 जणांना महादेव कोळी जमातीचे जातीचे दाखले मिळविण्यात यश मिळवले आहे. यापुढे सुरळीतपणे शासकीय आदेशानुसार सर्वांनाच जातीचे दाखले मिळतील असे वाटत असतानाच पुन्हा 100 जणांनी मागणी करुनही त्यांना जातीचे दाखले अद्याप मिळालेले नाहीत. या सर्वांना जातीचे दाखले त्वरीत मिळायला हवे होते मात्र मंत्रालयातून आदेश येऊ द्या.. असे अधिकार्‍यांकडून सांगितले जाते व टाळाटाळ केली जाते. हे असे आणखी किती दिवस चालणार? सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचे आदेश असुनही प्रशासकीय स्तरावरुन कोळी जमातीचे दाखले देण्यासंदर्भात कसलीही कार्यवाही केली जात नाही. आषाढी यात्रा कालावधीत कोळी जमात बांधवांसोबत कॅबिनेट मंत्री महोदय व आदिवासी विभागाचे अधिकारी यांच्यासोबत एक बैठक झाली होती. तेंव्हा दिलेल्या आदेशानुसार कसलीही कारवाई होत नाही. 
या प्रकरणात स्वत: मुख्यमंत्री महोदयांनीच लक्ष घालुन जातीचे दाखले देण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकार्‍यांची कानउघाडणी करुन हा प्रश्‍न सोडवणं आवश्यक आहे. तेंव्हा फडणवीस सरकार आपण जसा मराठा समाजाचा प्रश्‍न मार्गी लावलात तसा आमचाही प्रश्‍न मार्गी लावावा. असे मत गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केले आहे.


    















महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments