भोसे (क) : वार्ताहर,
नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या जानुबाई देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी सालाबाद प्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
भोसे (ता. पंढरपूर) येथील ग्रामदैवत जानुबाई देवीच्या यात्रेला गुरुवार (दि. 24) पासून सुरुवात झाली. पहाटे देवीची शास्त्रोक्त पूजा झाल्यानंतर महिला भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या, त्या सायंकाळपर्यंत कायम होत्या.
नवसाला पावणारी देवी अशी जानुबाई देवीची महती असल्यामुळे तिच्या दर्शनासाठी माहेरवाशीण- सासरवाशीण सहकुटुंब आल्या होत्या. “जानुबाई देवीचं चांगभले – जानुबाई देवीच्या हत्तीच चांगभले” अशा भक्तिपूर्ण घोषणांनी मंदिर परिसर फुलून गेला होता. दिवसभर देवीच्या दर्शनासाठी मंदिर परिसर भविकांनी फुलून गेले होते.
दुपारपासून हलगीच्या कडकडाटात, लेझीमेच्या ठेक्यावर, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि गुलालाची मुक्त उधळण करीत वाजत गाजत मानाच्या शेरण्या येत होत्या, या शेरण्या पाहण्यासाठी अबालवृद्धांनी गर्दी केली होती.
रात्री आठ वाजता तोफांच्या सलामीने व “जानुबाई देवीचं चांगभल, कोकणच्या आईचं चांगभल, देवीच्या छबिन्याचं चांगभल, देवीच्या हत्तीचं चांगभल” च्या गजरात देवीच्या छबिन्याला प्रारंभ झाला.
गावंधरे परिवाराचा मान असलेल्या दोन बैलगाडीमध्ये देवीचे दोन हत्ती, एका हत्तीवर देवीची मूर्ती आणि दुसऱ्या हत्तीवर देवीची अंबार अशा पद्धतीने छबिन्याला प्रारंभ झाला. छबिन्याला लेझीम मंडळ, झांज पथक, हलगी ताशा व शोभेच्या दारू कामाने चांगलाच रंग भरला होता. छबीना यशवंतराव महाराज मंदिर परिसरातून चावड़ी - माळी गल्ली ते मेन रोडवरून मुलींची शाळा व चांदनी चौकातून मंदिरापर्यंत पोहच करुन छबिण्याची सांगता करण्यात आली.
यात्रेनिमित्त बस स्थानक ते चावडी आणि चावडी ते चांदणी चौक रस्त्यावर वेगवेगळ्या वस्तूंची आणि खेळण्यांची दुकाने थाटली होती. भाविकांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत आणि सामाजिक संघटनांनी थंड पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी यात्रा कमिटीने चोख नियोजन केले होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.





0 Comments