लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. दरम्यान मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच भाजपा आणि मित्रपक्षांनी आघाडी घेतली. महाराष्ट्रातील ४८ जागांवर निवडणूक लढवणारया वंचित बहुजन आघाडीचा केवळ एक उमेदवार आघाडीवर असून काँग्रेसचाही चंद्रपूरमधील एक उमेदवार आघाडीवर आहे. ही आकडेवारी पाहता वंचित-काँग्रेसचा एकमेकांवर ब्लेमगेम सुरू झाला आहे. ‘लोकसभा निवडणूकीसाठी आम्ही काँग्रेसला हात दिला होता. मात्र त्यांनी हात मागे घेतला. आम्ही कुणाचे गुलाम नव्हतो’ अशी प्रतिक्रीया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देत काँग्रेसवर निशाणा साधला.
आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी भाजप २४ तर शिवसेना २० जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसचे चंद्रपूरमधील उमेदवार बाळूभाऊ धानोरकर आघाडीवर असून त्यांच्या विरोधात भाजपाचे अहिर हंसराज गंगाराम उभे आहेत. वंचितद्वारे महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा लढवण्यात आल्या. आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार वंचितचे औरंगाबाद येथील उमेदवार इम्तियाज जलील ११ हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे चंद्रकांत खैेरे तर अपक्ष हर्षवर्धन जाधव उभे आहेत.
मतमोजणीला सुरुवात होऊन अडीच तास होईस्तोवर भाजपा आणि मित्रपक्षांची आघाडी ३०० हून अधिक जागांपर्यंत पोहोचली आहे. एनडीएच्या तुलनेत यूपीएच्या जागा फार कमी आहेत. त्यातही २०१४ नंतर पुन्हा एकदा काँग्रेसला तीन आकडी जागा मिळवण्यात अपयश आले आहे. महाराष्ट्रात यंदा बदल होईल असं वाटत असतानाच पुन्हा एकदा राज्यात २०१४च्या लोकसभा निवडणुकीसारखा निकाल लागण्याची चिन्हे आहेत. राज्यातील अनेक मतदारसंघात शिवसेना-भाजपा उमेदवार आघाडीवर आहेत.





0 Comments