माजलगाव : हे घर माझे व माझ्या भावाचे असून ते आम्हाला विकायचे आहे. तू घराबाहेर नीघ, नाही तर पैसे दे, असे म्हणून भावजयीसह तिचे दोन भाऊ व भाचीवर अॅसिड फेकून हल्ला केल्याची धक्कादायक माजलगाव शहरातील कालिकानगर येथे घडली. या प्रकरणी माजलगाव शहर पोलिस ठाण्यात अहमद जैनुद्दीन जरगर व नजीब जैनुद्दीन जरगर (रा. कालिकानगर) अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगरपालिकेतील कर्मचारी असलेला शेख समीर शेख महेबूब (३५) हा या प्रकरणातील विवाहितेचा भाऊ असून त्याने माजलगाव शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शेख समीर हा जुना बाजार रोडवर मुलाबाळासह आई-वडील व भाऊ-भावजयीसह एकत्रित राहतो. त्याची बहीण रेश्मा जरगर हिचे लग्न इर्शाद जरगर याच्यासोबत झाले असून बहिणीला एक अलशफात नावाचा मुलगा व दिना नावाची मुलगी आहे. कालिकानगर येथे पती, सासू, सासरे, दीर एकत्रित राहतात. रेश्मा हिचा दीर अहमद जरगर हा बहीण रेश्मा ही घर विक्रीला विरोध करत असल्याने तिला शिवीगाळ करत होता.
दरम्यान, ३ मे २०१९ रोजी रात्री साडेअकरा वाजता रेश्मा इर्शाद जरगर हिने तिचा भाऊ शेख समीर याला फोन केला की, पती गावाला गेला असून दीर अहमद जरगर हा घरी शिवीगाळ करत आहे. हे ऐकून शेख समीर हा त्याचा भाऊ शेख मकसूद याला घेऊन भांडण मिटवण्यासाठी बहिणीच्या घरी कालिकानगर येथे गेला असता त्या ठिकाणी अहमद जैनुद्दीन जरगर व नजीब जैनुद्दीन जरगर हे दोघे रेश्माला शिवीगाळ करत होते. तेव्हा अहमद जरगर याने माझे व माझ्या भावाचे घर विकायचे असून बहिणीला घराबाहेर काढा, नाही तर आम्हाला पैसे द्या, असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली.
याच वेळी अहमद जरगर याने घरात पळत जाऊन सोन्याला पॉलिश करण्यासाठी ठेवलेले अॅसिड आणले. बहीण रेश्मा हिच्यासह तिच्या मुलाच्या अंगावर ते टाकण्यासाठी धाव घेत असताना त्याला शेख समीर याने बाजूला ढकलले.
अॅसिड हल्ल्यात समीर शेख मेहबूब शेख (३५), शेख मकसूद (३८), दिना इर्शाद जरगर (८) व अलशफात इर्शाद जरगर (१५) यासह रेश्मा इर्शाद जरगर (३३) जखमी झाले आहेत. यात समीर शेख हा गंभीर जखमी असून या प्रकरणी शनिवारी रात्री विवाहितेच्या भावाच्या तक्रारीवरून अहमद जैनुद्दीन जरगर व नजीब जैनुद्दीन जरगर (रा. कालिकानगर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. पुढील तपास पोलिस निरीक्षक सय्यद सुलेमान हे करत आहेत.




0 Comments