पंढरपूर दि.26 : सध्या चालू असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी आज विधीमंडळात पंढरपूर शहरातील चोरीच्या घटनांबाबत तारांकित प्रश्नाद्वारे आवाज उठविला.
पंढरपूर शहरातील जानेवारी 2016 ते मे 2016 या कालावधीत चोरीच्या 19, जानेवारी 2017 ते मे 2017 या कालावधीमध्ये 18 तर जानेवारी 2018 ते मे 2018 अखेर 21 व जानेवारी 2019 ते मे 2019 अखेर चोरीच्या सर्वाधिक घटना घडल्या असून अशा या एकूण 122 चोरीच्या घटनांपैकी केवळ सत्तावीसच गुन्हे उघड झाले आहेत. पंढरपूर शहरातील विरंगुळा हॉटेलचा दरवाजा तोडून चोरट्यांनी 1 लाख 70 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. त्याचबरोबर या कालावधीत पंढरपूर शहरातील दोन राष्ट्रीयकृत बँकांमध्ये चोरीच्या घटना घडल्या. पंढरपूर शहरात व उपनगरात सातत्याने लहान-मोठ्या चोरीच्या घटना घडत असल्यामुळे पंढरपूर शहरातील नागरिकांमध्ये भितीचे व संतापाचे वातावरण पसरले आहे. शहरातील सदर गुन्ह्यांचा तपास करणार्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तसेच चोरी व दरोडे रोखण्याबाबत शासनाने काय कारवाई केली असा तारांकित प्रश्न आमदार श्री भारत भालके यांनी विधानसभेत उपस्थित केला.
या प्रश्नावर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा.ना.श्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देतांना या चोरीच्या व दरोड्याच्या घटनांमध्ये प्राप्त फिर्यादीवरून आरोपी विरूध्द गुन्हे दाखल आहेत. बँक ऑफ इंडिया शाखा पंढरपूर येथून रू.40 हजाराची रोख रक्कम चोरट्यांनी नजर चुकवून पळवून नेली त्यापैकी एका आरोपीस अटक करून रू.13 हजाराची रोकड जप्त करण्यात आली. स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा पंढरपूर येथून 9 लाख 25 हजार 543 रूपयाची रक्कम चोरट्यांनी लंपास केली याप्रकरणी 11 आरोपी विरूध्द गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. पंढरपूर शहरातील चोरीच्या घटना रोखण्यासाठी दिवसपाळी व रात्रपाळी करिता 1 अधिकारी व 20 कर्मचारी यांची नेमणूक करून नाकाबंदी, चेकिंग, रात्रगस्त पेट्रोलिंग करण्यात येत आहे. तसेच संशयीतांना ताब्यवात घेऊन त्यांचेवर कारवाई करण्यात येत असल्यामुळे या चोरीच्या घटनांबाबत पंढरपूरातील नागरिकांमध्ये भितीचे व संतापाचे वातावरण नसल्याचे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले.





0 Comments