पंढरपूर (प्रतिनिधी):पंढरी नगरी आषाढीच्या तयारीत गुंतलेली असताना परमपूज्य सद्गुरू अण्णा महाराज राऊळ यांच्या भक्तांनी चंद्रभागेचे वाळवंट झाडून चकाचक केले. 'मी तुमचा झाडूवाला' ही अण्णा महाराजांची जीवनगाथा सुमारे 200 भक्तांनी चंद्रभागेच्या वाळवंटात सार्थ ठरवली.
आपले अखंड आयुष्य झाडूवाला म्हणून सार्थ ठरविणारे सद्गुरु अण्णा महाराज राऊळ यांचे भक्त शनिवार दिनांक 22 जून रोजी पंढरीत आले होते. परमपूज्य सद्गुरु राऊळ महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अण्णा महाराज चाॅरीटेबल ट्रस्ट पिंगुळी तालुका कुडाळ यांच्यावतीने सबंध राज्यात 'झाडू संतांचे मार्ग' या वचनाप्रमाणे अण्णा महाराजांनी आयुष्यभर केलेले स्वच्छतेचे कार्य जोमाने करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पंढरीतील चंद्रभागेच्या वाळवंटात महाराजांच्या सुमारे दोनशे भाविकांनी स्वच्छता केली. आणि वाळवंट चकाचक केले. आणि अण्णा महाराज राऊळ यांना अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या.

सद्गुरु अण्णा महाराज राऊळ हे अवलिया महाराज म्हणून कोकणात प्रसिद्ध आहेत. कृपा, आशीर्वाद, जादूटोणा, ज्योतिष इत्यादी तकलादू गोष्टींचा आधार न घेणारे अण्णा महाराज झाडूवाला म्हणून प्रसिद्ध आहेत.' मी तुमचा झाडूवाला' असे सांगत गावेच्या गावे स्वच्छ करणारे संत गाडगेबाबांचे पाईक आहेत. परमपूज्य सद्गुरु राऊळ महाराज यांचे ते चिरंजीव आहेत. वयाच्या तेराव्या वर्षापासून फक्त आणि फक्त स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या अण्णा महाराजांचे अमृत महोत्सवी वर्ष महाराजांचे भाविक मोठ्यां भक्तीभावाने साजरे करीत आहेत.





0 Comments