जिल्ह्यात सुवर्ण महोत्सव निमित्त ठिकठिकाणी मोर्च, आंदोलने व घोषणाबाजीने निवेदन सादर
पंढरपूर:- महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी कायद्याला आज 50 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्यावतीने डॉ. बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात 4 जून रोजी आपल्या विविध मागण्यांसाठी हमाल कामगारांचा एल्गार पूकारला होता. या एल्गाराला संपूर्ण महाराष्ट्रात हमाल मापाडी कामगारांनी आपले काम बंद ठेवून साथ दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील हमाल मापाडी महामंडळाच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर आंदोलन करून जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसिलदार यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आल्याचे हमाल मापाडी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाला आज म्हणजेच 5 जून 2019 ला 50 वर्ष पूर्ण होत आहे. हमाल मापाडी महामंडळाच्यावतीने हे वर्ष सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरी करीत आहेत. यानिमित्त महाराष्ट्रातील विविध केंद्रावरून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रविवार दि. 13 मे 2019 रोजी महामंडळाची डॉ. बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत माथाडी हमाल कामगार कायद्याला येत्या 5 जून रोजी म्हणजेच आज 50 वर्ष पूर्ण होत आहे. या कायद्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असताना हमाल कामगारांच्या मागण्याकडे विशेष लक्ष वेधून या सुवर्ण महोत्सवी दिवशी म्हणजेच आज रमजान ईद असल्याने मंगळवार दि. 4 जून 2019 रोजी सर्व संलग्न केंद्राने आपले काम बंद ठेवून जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसिल कार्यालयावर मागणी मोर्चा संघटीत करून आपल्या विविध मागण्याचे निवेदन यावेळी देण्यात आले.
यामध्ये पूढील मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
1) राज्या माथाडी हमाल कामगार कायद्याच्या अंमलबजावणीतील अनागोंदी व मनमानी कारभार तात्कांळ थांबवून कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार या कायद्यातील शब्द प्रयोगाकडे आवर्जून लक्ष वेधावे. या कायद्याची सार्वत्रिक अंमलबजावणी झालीच पाहिजे. 2) राज्यातील माथाडी मंडळाची गुंडाळपट्टी बंद करून मंडळे कार्यक्षम होतील. याची दक्षता घेतली जावी. 3) कामगार, उद्योग, पणन, सहकार व पुरवठा या खात्यात समन्वय ताकाळ प्रस्थापीत व्हावा, कोणालाही माथाडी कायद्यातून वगळण्याची मुभा परस्पर दिली जावू नये. 4) राज्यात माथाडी कायद्यातील तरतूदीनुसार राज्य सल्लागार मंडळ तसेच स्थानिक माथाडी मंडळाची रचना पॉप्युलर करावी व त्या मंडळांवर खर्या कामगार प्रतिनिधींची नियुक्ती केली जावी. 5) खाजगी व सरकारी गोदामे, वखार महामंडळे, माल वाहतूक व्यवसाय इत्यादी क्षेत्रात माथाडी कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी, लेव्ही शब्दाचा बाऊ केला जाऊ नये. 6) माथाडी कायद्याच्या नावाखाली चाललेल्या गुंडगिरीचा व खंडणीबहादूरांचा कठोर उपाय योजून बंदोबस्त व्हावा. 7) हमालांच्या पतपेढ्यांमधून कामगारांनी घेतलेल्या कर्जाची वसूली माथाडी मंडळाने करू नये हा वटहुकूम तात्काळ रद्द करावा. 8) माथाडी मंडळांना मालक या नात्याने कायद्याने अधोरेखित करावे. त्यात शासनाने केलेला बदल तात्काळ रद्द करावा. 9) माथाडी हमाल कामगार कायद्याचे अंमलबजावणीसाठी स्वतंत्र मंत्री असावा. विद्यमान कामगार मंत्री ना. संभाजीराव निलंगेकर यांनी सध्याची माथाडी मंडळे गुंडाळण्याबाबत निर्णय केला आहे तो निर्णय रद्द करावा व विद्यमान कामगार मंत्री यांची या पदावरून हकालपट्टी करण्यात यावी. 10) राज्यात पणन व माथाडी कायद्यातून तोलणारांना वगळण्याचे चाललेले प्रयत्न तात्काळ थांबविण्यात यावे. आदी मागण्यांची शासनाने ताबडतोब दखल घ्यावी अशी विनंती यानिवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सोलापूर हमाल पंचायतच्यावतीने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पंढरपूर हमाल पंचायतच्यावतीने प्रांताधिकारी सचिन ढोले, करमाळा हमाल पंचायतच्यावतीने तहसिलदार सुशिलकुमार बेल्हेकर, कुर्डूवाडी हमाल पंचायतच्यावतीने प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष पांडूरंग साबळे, भिमा शिताफळे, दत्ता मुरूमकर, मारूती बंदपट्टे, सुरेश खटके, आबाजी शिंदे, सुरेश बागल, बाप्पा चव्हाण, अॅड. राहूल सावंत आदी सह जिल्ह्यातील हमाल कामगार मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सामिल झाले होते.




0 Comments