पुणे: ज्येष्ठ लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं आज (गुरुवार) पुण्यात प्रदीर्घ आजााराने निधन झालं. एका खासगी रुग्णालयात गेले अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज सकाळी त्यांचं निधन झालं. निधनसमयी त्यांचं वय ८४ वर्ष होतं. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याआधी दुपारी ४ वाजेपर्यंत त्यांच्या पुण्यातील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहे. विद्या बाळ या आजपर्यंत अनेक आंदोलनांमध्ये सहभागी होत्या. तसंच लेखिका म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला होता.
विद्या बाळ यांचा जन्म १२ जानेवारी १९३७ साली पुण्यात झाला होता. त्यांनी आपलं पदवीचं शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पूर्ण केलं होतं. त्यानंतर त्यांनी सामाजिक चळवळींमध्ये सहभाग घेऊन स्त्रियांचे प्रश्न मांडण्यास सुरुवात केली होती.
स्त्रियांच्या अनेक प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला होता. एवढचं नव्हे तर स्त्रियांना आपले प्रश्न मांडता याव्यात यासाठी त्यांनी आपली संघटना देखील स्थापन केली होती. ज्यासाठी त्यांनी 'बोलते व्हा' हे एक केंद्र सुरु केलं होतं.
सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका यासोबतच त्या एक यशस्वी संपादक देखील होत्या. त्यांनी अनेक मासिकांसाठी संपादक म्हणून काम केलं होतं. या माध्यमातून अनेक प्रश्नांना त्यांनी हात घातला होता. यासोबत. पुणे आकाशवाणीसाठी त्यांनी जवळजवळ दोन वर्ष काम केलं होतं.
तेजस्विनी, वाळवंटातील वाट या त्यांच्या प्रसिद्ध कांदबऱ्या आहेतय याशिवाय त्यांनी अनेक कांदबऱ्या अनुवादित देखील केल्या आहेत. तसंच डॉटर्स ऑफ महाराष्ट्र, तुमच्या माझ्यासाठी, शोध स्वतःचा यासारख्या अनेक स्फुट लेखांचे संकलन केले आहे. विद्या बाळ यांना आजवर अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. आगरकर पत्रकारिता पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार आणि शंकरराव किर्लोस्कर यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होते.
0 Comments