सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- 
सांगली : खटाव (ता. पलूस) येथील राष्ट्रवादीचे नेते, माजी सरपंच आनंदराव पाटील (५३) यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हल्ला करून त्यांचा खून केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांचे ते बंधू होते. त्यांच्यावर दोन अज्ञातांनी खुनी हल्ला केला होता. दुचाकीवरून आलेले दोघे आनंदराव पाटील यांच्यावर हल्ला करून पसार झाले. आनंदराव पाटील हे राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते असून ते खटाव-भिलवडी रस्त्यावर असलेल्या आपल्या शेतातून परतत असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला होता.

शेतातून परतत असताना पाटील यांच्यावर सत्तुराने हल्ला झाला. डोक्यावर, हातावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याने व डोक्यातील वार वर्मी बसल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

त्यांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोर मोटारसायकलवरून पसार झाले. त्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकही आणले होते.

आर. आर. पाटलांचे कट्टर कार्यकर्ते
माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे आनंदराव पाटील हे कट्टर कार्यकर्ते होते. ते सन २००४ ते २००९ दरम्यान खटावला सरपंच होते. सांगली जिल्हा मजूर फेडरेशन, तासगावच्या सूतगिरणीत सध्या संचालक होते. विकास सोसायटी व पाणीपुरवठा संस्था त्यांच्या ताब्यात होती. गावात त्यांचा स्वतंत्र राजकीय गट होता. पाटील यांना दोन मुले व एक मुलगी आहे. थोरला अभिजित पुणे येथे उद्योग क्षेत्रात, तर धाकटा विश्‍वजित कृषी पदवीधर आहे.


'इन कॅमेरा' शवचिकित्सा करा
घटनेनंतर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी होती. मोठा बंदोबस्तही तैनात केला होता. मृतदेहाची उत्तरीय तपासणी 'इन कॅमेरा' व्हावी, अशी मागणी नातेवाइकांनी केल्याने सायंकाळी उशिरापर्यंत उत्तरीय तपासणी करण्यात आली नव्हती.

Post a Comment

0 Comments