पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनाचं पालन करा. जर सूचनाचं पालन केलं नाही तर आपल्यालाबरोबरच पुढच्या पिढीलाही याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी दिला आहे. त्यांनी आज दुसऱ्यांदा फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला.
कोरोनावर आपण विजय मिळवणारच आहोत. पण, त्यासाठी सरकारकडून दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे घरात राहा. पोलिसांवर कारवाई करण्याची वेळ देऊ नका. हे संकट मोठं आहे.
लॉकडाउनच्या काळात मी सुद्धा घराबाहेर पडलेलो नाही. या काळात दैनंदिन स्वच्छता पाळा. त्याकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याला जपा. हे संकट मोठं आहे. पुढचे काही महिने आपल्याला काटकसर करावी लागणार आहे. वायफळ खर्चाला कात्री लावावी लागणार आहे. कोरोनाचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. नगर पालिकांपासून ते केंद्र सरकारपर्यंत सर्वांनाच आर्थिक फटका बसणार आहे, असेही पवारांनी सांगितले आहे.
शरद पवार म्हणाले की, शेतकऱ्यांना मोफत धान्य देताना शेतकऱ्यांकडे असलेला शेतमाल विकत घेण्याबाबत विचार करावा. शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला यामुळे मोठा फटका बसला आहे, असेही पवार म्हणाले. करोनाचा मानवासह पशु- पक्ष्यांवरही परिणाम झाला आहे. सरकार याबाबत काही सूचना देत आहे. सरकारच काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या सरकारच्या सुचनांकडे दुर्लक्ष कराल तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असेही पवार म्हणाले.
मालकांनी कामगारांना जपावं
जेवढ्या कंपन्यात कामगार काम करतात, त्या कंपनी मालकांनी कामगारांना जपावं, त्यांच्या वेतनाची खबरदारी घ्यावी, करोनाशी लढण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार, खासदार एका महिन्याचा वेतन देणार असल्याचे देखील पवारांनी घोषित केले.
द्राक्ष व आंबा उत्पादकांना सरकारने मदत करावी
करोनाचा सामना करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार, केंद्र सरकार, राष्ट्रीय संघटना, आंतर राष्ट्रीय संघटना यांची अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. देशातील अर्थव्यवस्थेवर याचा गंभीर आणि दीर्घकालीन परिणाम होणार आहे. अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना अडवू नका. संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी सर्व शक्ती वापरा. द्राक्ष व आंबा उत्पादकांना सरकारने मदत करावी. ईएमआयबाबत सरकारने विचार करावा. फळबागांच्या नुकसानीकडे लक्ष दिले गेलं पाहिजे, असेही पवार म्हणाले.
करोनामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. तसेच सध्या शेतकऱ्यांची स्थिती बिकट आहे. त्यामुळे त्यांना पीक कर्जाची परतफेड शक्य नाही. सरकारने पीक कर्जाचे पुढील चार ते पाच वर्षांसाठी हफ्ते पाडून द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी सांगितले. दरम्यान, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील दिली.
'कोरोनाचं संकट गेल्यानंतर येणारा काळ आर्थिक आव्हानांचा असेल. त्यामुळे त्या काळात काटकसरीने वागणं, वायफळ खर्च टाळणं हे आपल्याला करावं लागेल' असा आर्थिक शिस्तीचा धडा शरद पवारांनी लोकांना दिला. 'आपण या संकटातून जे शिकलो, ते अनुभव इथून पुढच्या जीवनात देखील पाळावे लागतील. आपल्या सवयी बदलाव्या लागतील. आर्थिक संकट समोर उभं आहे. उत्पादन, व्यवसाय असं सगळं बंद आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर देखील होणार आहे. त्यामुळे आपण या परिस्थितीला कसं सामोरं जायचं, याचा विचार करायला हवा. वैयक्तिक जीवनात काटकसरीने राहण्याची, वायफळ खर्च टाळण्याची सवय लावावी लागेल. ते केलं नाही, तर पुढचं आर्थिक संकट अधिक गंभीर असेल. विकासाचा दर २ टक्क्यांपर्यंत खाली येणार असेल, तर त्याचे परिणाम विकासावर गंभीर असतील', असं शरद पवार म्हणाले.

