तिर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी मुंबईच्या तरुणांची ‘बाईक सफारी’; पंढरपूर लाईव्ह कार्यालयास सदिच्छा भेट!

Pandharpur Live- पंढरपूर लाईव्ह वृत्त- गेल्या 11 वर्षापासुन मुंबई येथील कांही तरुण पश्‍चिम महाराष्ट्रातील कांही तिर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी ‘बाईक सफर’ अर्थातच दुचाकीवरुन प्रवास करत आहेत. हे सर्व तरुण भुवैकुंठ पंढरी नगरीत आल्यानंतर त्यांनी पंढरपूर लाईव्ह कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी पंढरपूर लाईव्हचे मुख्य संपादक भगवान वानखेडे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या प्रवासाबद्दल व एकुणच या ‘हटके’ सफरीबद्दल अधिक माहिती.....

ठाणे (मुंबई) येथील विविध क्षेत्रात नोकरी-व्यवसाय करणारे, शिक्षण घेणारे 8 मित्र एकत्र आले असताना चर्चेदरम्यान पंढरीच्या पांडुरंगाचे, आई तुळजाभवानीचे व अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या दर्शनास जाण्याचे ठरले. पण सर्व प्रवास चार चाकी गाडीत न करता दुचाकीवरुन करायचा असे ठरले. अर्थातच दुचाकींची कागदपत्रे सोबत घेवून व कायदेशीर बाबींची पुर्तता करुन वाहतुकीचे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करायचे असे ठरले. खंडाळा सोडल्यानंतर मात्र प्रवासाची दिशा बदलली आणि तिर्थक्षेत्रांच्या गावांची संख्या वाढली. 

मुंबई सोडल्यानंतर पहिल्या दिवशी महडच्या श्रीगणेशाचे दर्शन, एकवीरा आईचे दर्शन, देहू येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे दर्शन, आळंदीच्या अर्थातच अलंकापुरीच्या श्रीसंत ज्ञानेश्‍वर माऊलींचे दर्शन, तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थानाचे दर्शन व थेऊरच्या गणपतीचे दर्शन घेतात.

दुसर्‍या दिवशी अक्कलकोट येथील श्रीस्वामी समर्थांचे दर्शन, गाणगापूरमधील श्रीदत्तांचे दर्शन व गुलबर्गा येथील खाजाबंदे नवाज यांच्या दर्ग्याचे दर्शन झाल्यानंतर परत अक्कलकोट येथे येवुन येथील इतर देवस्थानांचे दर्शन घेतात.

तिसर्‍या दिवशी  श्रीतुळजा भवानी मातेचे दर्शन घेवून पंढरी मुक्कामी येतात. चंद्रभागेचे स्नान, श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन आणि इतर देवस्थान, मठांचे दर्शन घेतात. 4 थ्या दिवशी पुन्हा एकदा श्रीविठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेवून ही मंडळी जेजूरी येथे श्रीखंडोबा देवस्थानाकडे दर्शनासाठी जातात. येथे म्हाळसाकांताचे दर्शन घेवून परतीच्या मार्गाला लागतात.

हे सर्व तरुण मुंबईकर पंढरपूर लाईव्हचे दर्शकही आहेत. पंढरीत आल्यानंतर दर्शन तेलवणे, मनिष साळवी, नितीन चाळके, प्रविण भोईर व सिध्देश ठोंबरे या सर्व मित्रांनी आावर्जुन पंढरपूर लाईव्ह कार्यालयास सदिच्छा भेट दिली.  पंढरपूर लाईव्हमुळे आम्हाला पंढरपूर परिसरासह महाराष्ट्रातील महत्वाच्या ताज्या घडामोडी माहिती होतात. असे मत  यावेळी त्यांनी व्यक्त केले. 
एका बाईकवर दोघे अशा या 8 मित्रांची 4 बाईकवरची ही ‘बाईक सफारी’ गेल्या 11 वर्षापासुन अविरतपणे आणि निर्विघ्नपणे सुरु आहे. त्यांच्या पुढील सफरीसाठी आणि उज्जवल भवितव्यासाठी पंढरपूर लाईव्ह कडून हार्दिक शुभेच्छा!

Post a Comment

0 Comments