महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम... मला ही रुग्णांची संख्या शून्य करायची आहे- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- आपण कोरोना संसर्गाचा वेग मंद राखण्यात यशस्वी झालो आहोत. मात्र मला ही रुग्णांची संख्या शून्य करायची आहे. असं सांगतानाच महाराष्टातलं लॉकडाउन हे कायम राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. यावेळी त्यांनी प्रत्येकाने अजुनही घरात बसायला हवं. आपल्या राज्यातील जनता सर्व आदेशांचं पालन करत आहेत. आपला महाराष्ट्र हा देशाला नव्हे तर जगाला दिशा दाखवतो, असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे हे तर खरं आहे. पुण्यात सुरुवात झाली, मुंबईत रुग्ण वाढले आहेत. कारण मुंबई हे जगाचं प्रवेशद्वार आहे. आपण तपासण्या सुरु केल्या तेव्हा केंद्राकडून आलेल्या यादीतल्या देशांना बंदी होती. मात्र जे देश यादीत नव्हते त्यातले रुग्ण मिसळले. आता मुंबईत ज्या ज्या ठिकाणी रुग्ण आढळले आहेत ते भाग सील केले आहेत.

जे रुग्ण आपल्याला सापडलेत त्याची तपासणी महापालिका घरोघरी जाऊन करते आहे. आता समोरुन रुग्ण येण्याची वाट बघत नाही, तर घरी जाऊन चाचण्या करतो आहोत. मुंबईत संख्या १ हजारांवर गेली आहे.

दुर्दैवाने ज्यांचा मृत्यू झाला आहे ती संख्या वाढते आहे. ज्यांचं वय जास्त आहे त्यांचा धोका वाढतो आहे. ज्यांना आधीपासून काही विकार आहेत अशा रुग्णांवर करोनाचा गंभीर परिणाम होतो आहे.
आकाश पांघरुनी जग हे शांत झोपलेले हे गाणं आठवतं आहे. आकाश तर पांघरलं आहे पण झोप उडाली आहे सगळ्यांची अशी अवस्था आहे