शासनाकडून सर्वसामान्यांना सरसकट रेशन व गॅस सिलेंडर मिळावे-सौ.आरती बसवंती




      पंढरपूर (प्रतिनिधी):-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या दैनंदीन गरजांची पुर्तता करण्याच्या दृष्टीने राज्याचे सरकार अतिशय नियोजनबध्द उपाययोजना राबवित आहे. याचा आम्हास नितांत अभिमान आहे.  कोरोना विषाणुच्या या संकटकाळात आम्ही एक शिवसैनिक म्हणुन सर्वसामान्यांच्या दैनंदीन अडीअडचणींबाबत माहिती घेत असताना शासनाकडून स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून वितरित करण्यात येणार्‍या धान्यापासून व गॅस सिलेंडरच्या लाभापासुन अनेकजण वंचीत राहत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे सर्वच सर्वसामान्यांना सरसकट मोफत रेशन व गॅस सिलेंडर मिळावे. अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख सौ.आरती ओंकार बसवंती यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. नुकतेच त्यांनी या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी सचिन ढोले यांचेकडे सुपूर्त केले. यावेळी शिवसेना माजी उपशहरप्रमुख लाय.ओंकार बसवंती, लाय. श्रीमती ललिता कोळवले, लाय.रा.पा. कटेकर,लाय.डॉ.सुजाता गुंडेवार, लाय. डॉ.पल्लवी माने आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.  
             केवळ रेशनकार्ड नाही अथवा आहे हे रेशन कार्ड ऑनलाईन झालेले नाही, थम्ब झालेले नाहीत या कारणास्तव अनेकांना शासनाकडून मिळणार्‍या मोफत रेशनमालापासुन वंचीत रहावे लागत आहे, याचबरोबर अनेकांकडे उज्वला गॅस योजनेचे गॅस कनेक्शनच नसल्याने अशा सर्वसामान्यांनाही गॅस सिलेंडर्स मिळत नाहीत. यामुळे त्यांचा दररोजच्या रोजी-रोटीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.  रेशनकार्ड पासून वंचित राहिलेले बहुतांश लोक हे उदरनिर्वाह करण्यासाठी स्थलांतरित झाले होते. त्यामुळे ज्यांच्याकडे रेशनकार्ड आहेत त्यांचीही ऑनलाईन नोंदणी झालेली नव्हती.हे लोक आता कोरोनामुळे आपला रोजगार गमावून गावाकडे परतले आहेत त्यांना स्वस्त धान्य दुकानाकडून धान्य मिळणे गरजेचे आहे. अनेक नागरिकांकडे रेशन कार्ड नाही अशा लोकांना तो ज्या गावचा रहिवाशी आहे तेथील मतदान ओळखपत्र व आधार कार्ड पाहून रेशनमाल देण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच सर्वांनाच गॅस सिलेंडर उपलब्ध करुन द्यावेत अथवा नवीन उज्वला गॅस कनेक्शन उपलब्ध करुन द्यावेत.  अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.