‘स्वराज्याचे मावळे’ या शिवरायांच्या मावळ्यांच्या जीवनावरील पहिल्या काव्यसंग्रहाची ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नोंद

Pandharpur Live -

वाशिम (प्रतिनिधी)

वाशिम जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी नागराळे (जन्म १ मार्च १९८०यांनी काव्यबद्ध केलेल्या ‘स्वराज्याचे मावळे’ या काव्यसंग्रहाची छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या जीवनावरील पहिला काव्यसंग्रह म्हणून महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद करण्यात आली आहे. मराठी साहित्याच्या इतिहासात आजवर अनेक पुस्तके प्रकाशित झालीत पण महाराष्ट्रात प्रथमच एका वेगळ्या धाटणीचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि तो म्हणजे ‘स्वराज्याचे मावळे’. या नाविन्यपूर्ण कवितासंग्रहाची ‘महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये नोंद झाली.

रयतेचे परकीय शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी व रयतेला हक्काचं, न्यायाचं आणि सुखाचं स्वतःचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याचे स्वप्न मनी धरलं आणि त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी बाळकडू बालवयापासूनच पाजले. न्याय निवडा करणे आणि युद्धनीतीचे धडे देत शिवबांना घडवले. बालवयापासूनच त्यांचे सवंगडी सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात लढाया करणारे निष्ठावंत, शूरवीर आणि पराक्रमी मावळे स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावण्यासाठी सदैव तयार असत. अशा शूरवीर, पराक्रमी, निष्ठावंत आणि स्वामीभक्त मावळ्यांचा जाज्वल्य इतिहास ‘स्वराज्याचे मावळे’ या काव्यसंग्रहामध्ये कवितेच्या माध्यमातून गुंफण्याचा प्रयत्न केला आहे. इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात ठराविकच मावळ्यांचा उल्लेख आहे. स्वराज्याच्या कामी पडलेल्या सर्व मावळ्यांना न्याय दिला गेला नाही.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

शूरवीर, मातब्बर, प्रसंगावधानी आणि अंगाने धिप्पाड असणारे असे हे मावळे यात नरवीर तानाजी मालुसरे, शूरवीर शिवा काशीद, आग्रवीर हिरोजी फर्जंद, प्रसंगावधानी जीवा महाला, वीररत्न बाजी पासलकर, रणवीर बाजीप्रभू देशपांडे, धारकरी मुरारबाजी देशपांडे, स्वामिनिष्ठ फिरंगोजी नरसाळा, वीर येसाजी कंक, रणझुंजार कान्होजी जेधे, सरनोबत प्रतापराव गुजर, प्रतिशिवाजी नेताजी पालकर, सरसेनापती हंबीरराव मोहिते, सेनाधिकारी सिद्धी हिलाल, गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक, स्वराज्य भीम कोंडाजी फर्जंद, झुंजार सूर्यराव काकडे, वीर मल्हारराव होळकर, वीर रामजी पांगेरा, वीर संताजी घोरपडे, वीर धनाजी जाधव, वीर दत्ताजी शिंदे, वीर हिरोजी इंदुलकर, वीर मुस्लीम मावळे: वीर सिद्धी हिलाल, वीर सिद्धी वाहवाह, वीर सिद्धी इब्राहीम, वीर नुरखान बेग, विर मदारी मेहतर, वीर सिद्धी अंबर, वीर रुस्तुमे जमान, वीर दर्या सारंग, वीर इब्राहीम खान, वीर दौलत खान, वीर दाऊद खान, वीर हसन खान मियानी अशा जवळपास चाळीस मावळ्यांच्या जाज्वल्य इतिहास वाचताना अंगावर काटा आणणारे अनेक प्रसंग आहेत. प्रत्येक मावळा छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी अंगठीतल्या हिऱ्यासारखे होते; प्राणप्रिय होते.

या अशा अत्यंत निष्ठावंत आणि पराक्रमी मावळ्यांना ‘स्वराज्याचे मावळे’ या काव्यसंग्रहात गुंफताना कवयित्री मिनाक्षी नागराळे यांनी अष्टाक्षरी, काव्यांजली काव्यप्रकार, अभंग रचना आणि मुक्तछंद काव्य इत्यादी काव्यप्रकारात गुंफण्याचा प्रयत्न केला आहे. ‘स्वराज्याचे मावळे’ या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर गडावर उभे असलेल्या मावळ्यांचे चित्र खूप आकर्षक दिसत असून त्यामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमासुद्धा घेतल्या आहेत. महाराष्ट्रातील घरा-घरात हे पुस्तक पोचले तर उद्याच्या भावी पिढीला शूरवीर मावळ्यांचा खरा इतिहास वाचता येईल आणि त्यातूनच बलाढ्य शत्रूला जेरीस आणणाऱ्या व एकेक मावळा म्हणजे शंभर हत्तीचे बळ आणणारा, शूरवीर, पराक्रमी, जिगरबाज, जीवाची पर्वा न करणाऱ्या मावळ्यांच्या समर्पित आणि त्यागमय जीवनातून मराठी तरुणांना निश्चितच नवप्रेरणा व ऊर्जा मिळेल.

कवयित्री मिनाक्षी नागराळे यांनी लिहिलेल्या ‘स्वराज्याचे मावळे’ या काव्यसंग्रहाची आणि मराठी साहित्य विश्वातील कार्याची दखल विशेष घेऊन त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या जीवनावरील पहिला काव्यसंग्रह म्हणून महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् चे मुख्य संपादक डॉ. सुनील दादा पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

कवयित्री मिनाक्षी नागराळे यांच्या नावावर नोंदवला गेलेल्या या विशेष विक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.    


Post a Comment

0 Comments