पंढरपूर तालुक्यातील एक सच्चा सहृदयी नेता काळाच्या पडद्याआड... राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष राजुबापु पाटील यांचे कोरोनामुळे निधन

राष्ट्रवादी चे नेते शरद पवार यांचे निष्ठावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष, पंढरपूर तालुक्याचे जेष्ठ नेते (कै.) यशवंतभाऊ पाटील यांचे चिरंजीव राजुबापू पाटील (वय 56)  यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले.  

गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे सोलापूर मधील अश्विनी हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.  

राजु बापू पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे सर्वात नजीकचे आणि विश्वासू सहकारी समजले जातात.  विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि जिल्हा परिषदेचे सभापती पदाच्या माध्यमातून त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात व समाजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला होता. यापूर्वी त्यांनी विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी लक्षवेधी मते मिळवली होती.

 नुकताच त्यांनी गुळ कारखाना काढून ऊस उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता.  शरद पवार यांच्या शिफारशीवरून,  आशिया खंडातील सर्वात मोठ्या  असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती झाली होती. यापूर्वी त्यांचे वडील कै. यशवंत भाऊ पाटील यांनीदेखील तब्बल 49 वर्षापर्यंत या रयत शिक्षण संस्थेचे सदस्य पद भूषवले होते. एकाच कुटुंबातील दोन पिढ्यांना या संस्थेवर संधी देण्याचा इतिहास लिहिला गेला होता.

राजू बापू पाटील हे जिल्हा परिषद चे सदस्य होते, त्यांनी पाच वर्षे जि.प. चे काम पाहत असताना सभापती म्हणून देखील आपले कार्याचा ठसा उमटविला होता.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक होते.  तब्बल दोन पिढ्यांपासून भोसे जिल्हा परिषदेवर त्यांचा एकहाती वरचष्मा होता. 

सर्वात दुःखद म्हणजे अवघ्या एका महिन्याभरात पाटील कुटुंबातील तीन सदस्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 1 ऑगस्ट राजुबापुंचे चुलते प्राचार्य अनंतराव पाटील, 8 ऑगस्ट ला धाकटे बंधु महेश पाटील (कृषीराज शुगर्स चे चेअरमन) या दोघांचे कोरोनावर उपचार सुरू असतानाच निधन झाले होते. तर आज  राजुबापु पाटील यांचेही कोरोनामुळेच निधन झाले. 

पाटील कुटुंबातील तीन सदस्यांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या या कुटुंबातील आणखी 3 सदस्यांवर कोरोनाबाधीत असल्याने उपचार सुरू आहेत.  राजुबापु पाटील यांच्या मातोश्री,  पत्नी व बंधु शेखर पाटील यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

राजुबापु पाटील हे लोकांना सहज भेटणारे आणि भोसे पंचक्रोशीसह पंढरपूर तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी तातडीने दूर करणारे नेते म्हणून ते लोकप्रिय होते त्यांच्या जाण्याने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

 पंढरपूर तालुक्यातील एक सच्चा सहृदयी नेता राजुबापुंना पंढरपूर लाईव्ह परिवाराच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली. 

पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी लोकनेते राजूबापू पाटील चित्र रेखाटून अशी अनोखी श्रद्धांजली वाहिली.



Post a Comment

0 Comments