Pandharpur Live Online- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित
'अभिष्टचिंतन' कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस गावागावात पोहोचवण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराच्या दृष्टीनं काम करण्याचा मंत्र कार्यकर्त्यांना दिला. जेष्ठ नेते शरद पवार आज 81व्या वर्षात पदार्पण करत आहेत. मुंबईतील अभिष्टचिंतन कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस गावागावात पोहोचवण्याचं आवाहन केले.
महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विज्ञानाचा आधार घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गावागावात आधुनिकता आणि विज्ञानाच्या विचाराची पिढी निर्माण करण्याचं आपलं काम आहे, असं शरद पवार म्हणाले.
जी विचारधारा आपण स्वीकारली, जीवनाचे जे सूत्र स्वीकारले त्या रस्त्यानं जाण्याचा अखंड प्रयत्न करायचा असतो. हे केल्यास अन्य पिढीतील लोकांना प्रेरणा देतो. सार्वजनिक जीवनात आपण सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहोत. शेवटच्या माणसाच्या हितासाठी आपण लक्ष देतो, तेव्हा आपल्याला पुढचा मार्ग कोणता याची स्पष्टता येते. जागृत राहून समाजकारण करता आलं पाहिजे. गेल्या 50 वर्षांपासून काम करत आहे. महाराष्ट्रातील जनतेने आणि कार्यकर्त्यांनी साथ दिली. त्यामुळे इथपर्यंत पोहोचलो, असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांनी यावेळी बोलताना त्यांच्या आई शारदाबाई पवार यांचा आवर्जून उल्लेख केला. महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरुंच्या विचारानं काम केले पाहिजे, ही भूमिका आईनं घेतली. यासोबत कौटुंबिक जबाबदारी पाळली पाहिजे, ही शिकवण आईकडून मिळाली. त्यांच्या शिकवणीवर चालण्याचं काम केलं, असंही ते म्हणाले.
शरद पवार यांचे ट्विट- शुभेच्छांच्या वर्षावाने मी भारावून गेलो
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने देशाच्या पंतप्रधानांसह अनेकांनी त्यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यावर शुभेच्छांच्या वर्षावाने मी भारावून गेलो असे ट्विट करत पवार यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
'आज माझ्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील माझे सर्व सहकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि डिजिटल रॅली व इतर माध्यमांतून महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने माझ्यावर त्यांच्या निस्सीम प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला त्याने मी भारावून गेलो आहे', असे ट्विट पवार यांनी केले आहे.
फुले-शाहू-आंबेडकरांच्या दृष्टीचा स्वीकार करण्याची गरज
महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख करुन चालणार नाही. त्यांनी आपलेल्या दिलेल्या दृष्टीवर चालण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे. महात्मा फुले खेड्यात जन्माला आले, पण त्यांनी आधुनिकतेचा पुरस्कार केला. पंचम जॉर्ज यांना महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसदर्भात दिलेल्या निवेदनाची आठवण शरद पवारांनी करुन दिली. हा देश शेतीप्रधान आहे. शेतकरी जुनीच बियाणं वापरतात, त्यांना नवीन संकरित बियाणं द्यावीत. दूधाच्या व्यवसायात प्रगतीसाठी गायींची नवीन जात निर्माण करण्याची मागणी महात्मा फुलेंनी केली होती. जोतिबा फुलेंनी आधुनिक विज्ञानाचा स्वीकार करुन समाजासमोर आदर्श निर्माण केला. महात्मा फुलेंच्या जीवनातील उदाहरण देऊन शरद पवार यांनी शेतकऱ्यांना आधुनिकतेचा स्वीकार करण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला.
राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंचा आधुनिक दृष्टीकोन स्वीकारला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यापूर्वीच्या सरकारच्या मंत्रिमंडळात यांनी जलसंपदा आणि वीज मंत्रिपद भूषवले. देशात सुबत्ता आणण्यासाठी पाण्याचा संचय करण्यासाठी धरणं बांधली पाहिजेत. त्यांनी जलविद्युत प्रकल्प उभारण्याची गरज मांडली आणि तो विचार प्रत्यक्षात आणला. भाक्रा नांगल धरण प्रकल्प उभारुन जलविद्युत प्रकल्प प्रत्यक्षात आणला, असंही शरद पवार म्हणाले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शुभेच्छा!
८० वर्षांचे होऊनही शरद पवार यांचे वय वाढलेच नाही असा त्यांचा उत्साह आजही दिसतोय. खऱ्या अर्थाने लोकप्रिय, संघटना कुशल, राज्याचे व देशाचे प्रश्न उत्तम तऱ्हेने जपणाऱ्या, मोदींपासून क्लिंटनपर्यंत संबंध ठेवणाऱ्या, सुस्वभावी, स्नेह आणि शब्द जपणाऱ्या, हत्तीची चाल आणि वजिराचा रुबाब असलेल्या शरद पवार यांचे पुढील आयुष्य हे गंगा-यमुनेची विशालता आणि हिमालयाची उत्तुंगता गाठणारे होवो, अशा शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. 'ठाकरे सरकार' ही शरद पवारांची अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठी बेरीज असल्याचंही शिवसेनेनं म्हटलं होतं. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील शरद पवार यांच्यासह फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.
"महाविकास आघाडीचे आधारस्तंभ शरद पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांची ऊर्जा, उत्साह आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा देत राहो हीच सदिच्छा. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही शुभकामना," असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
'शरद पवार साहेब हे खूप मोठे नेते आहेत, मी त्यांच्या कुटुंबातला सदस्य आहे, त्यांचा हा 80 वा वाढदिवस आहे.
तसंच 'आज देशाच्या किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही झाले की, लोक म्हणतात, यामागे शरद पवार यांचा हात आहे, पण मी या सर्व गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाही, मी असे म्हणेन की जेव्हा जेव्हा देशात किंवा राज्यात समस्या उद्भवतात तेव्हा प्रत्येक जण पवार यांच्याकडे या आशेने पाहतो की ते नक्कीच तोडगा काढतील' असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला.
हिमालयातील उंचीच्या महाराष्ट्रातील सह्याद्रीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असं म्हणत अजित पवार यांनी आपली भावना व्यक्त केली.
तर दुसरीकडे, तप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून शरद पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहे. शरद पवार यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, तुम्हाला चांगले निरोगी आरोग्य लाभो, दीर्घआयुषी व्हावा, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून स्तुती
''जीवेत शरदः शतम्' म्हणजे 'शतायुषी व्हा' असे आशीर्वाद हजारो वर्षांपासून या देशातील ज्येष्ठ माणसे तरुणांना देत आलेली आहेत, पण वय वर्षे 80 असलेले पवार हे ज्येष्ठ आहेत की तरुण, या संभ्रमात अनेक वर्षे देश पडलेला आहे. कारण अनेकदा तरुण आराम फर्मावत असतात तेव्हा पवार हे महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात. 80 व्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येस पवार देशाच्या राजधानीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रपतींकडे शिष्टमंडळ घेऊन गेले. त्यांनी दिल्लीच्या व्यासपीठावर शेतकऱ्याचे प्रश्न मांडले. कोविड काळात, निसर्ग चक्रीवादळात त्यांनी गावात जाऊन शेतकऱ्यांची दुःखे समजून घेतली. त्यामुळे पवार हे 80 वर्षांचे झाले यावर कोण विश्वास ठेवणार? आज शिवसेनाप्रमुख हयात असते तर त्यांनी वडीलकीच्या नात्याने 'शरदबाबूं'ना भरभरून आशीर्वाद दिले असते, पण आज पवारांना आशीर्वाद देऊ शकतील असे 'हात' नाहीत व पवार झुकून नमस्कार करतील असे 'पाय' दिसत नाहीत.' असं म्हणत सेनेनं बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या मैत्रीला उजाळा दिला.
रोहित पवारांकडूनही शुभेच्छा
"महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड", अशा शब्दांत रोहित पवारांनी शरद पवारांचं वर्णन केलं. "महासागराप्रमाणे खोली आणि हिमालयाप्रमाणे उंची असलेला आमचा आधारवड! आदरणीय पवार साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शतायुषी व्हा आणि माझ्यासारख्या युवांना आणि नव्या पिढीला कायम मार्गदर्शन करत रहा," असं ट्विट रोहित पवारांनी केलंय.
0 Comments