पंढरपुरात डॉ. स्नेहा रोंगे यांच्या वैद्यकीय सेवेचे उदघाटन ; स्त्रीरोग व प्रसुतीतज्ञ डॉ. स्नेहा रोंगे ह्या डॉ. बी.पी. रोंगे सरांप्रमाणे उत्तम समाजसेवा करतील. - नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले

येथील भोसले चौकातील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये बोहरी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग व प्रसुतीतज्ञ डॉ. स्नेहा सुरज रोंगे यांनी नुकतीच वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू केली.त्याचे उदघाटन करताना पंढरपूरच्या नगराध्यक्ष सौ.साधनाताई भोसले सोबत स्त्रीरोग व प्रसुतीतज्ञ डॉ. स्नेहा सुरज रोंगे, स्वेरीचे डॉ. बी.पी. रोंगे, विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे आदी 

पंढरपूर: ‘डॉ.आरिफ बोहरी यांचा प्रदीर्घ अनुभव आणि डॉ.स्नेहा रोंगे यांचे अपार कष्ट हेच त्यांच्या रुग्णालयाला यशाच्या शिखरावर नेतील.आजपर्यंतचा इतिहास हा आहे की, या ठिकाणी (बोहरी हॉस्पिटल, भोसले चौक) प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनी पुढे जाऊन स्वतःचे मोठे हॉस्पिटल उभारलेले आहे. डॉ. स्नेहा ह्या देखील आरोग्य सेवा करताना मेहनत घेतील, कष्ट घेतील. कारण ‘माहेर’ आणि ‘सासर’ या दोन्ही नात्यांचा संबंध ‘स्त्री’मध्ये असतो. ज्याप्रमाणे डॉ. बी.पी. रोंगे सर शिक्षणाच्या माध्यमातून परिश्रमाने विद्यार्थ्यांच्या मनात तंत्रशिक्षणाची गोडी निर्माण करून यशस्वीपणे स्वेरी संकुल चालवीत आहेत त्याप्रमाणे डॉ. स्नेहा आपल्या कष्टाच्या तयारीला बौद्धिक ज्ञानाची जोड देत हाती घेतलेल्या कामात निश्चित यश आणतील. आज स्वेरीचे नाव राज्यभर झाले आहे. त्याप्रमाणे डॉ. बी.पी. रोंगे सरांच्या स्नूषा डॉ. स्नेहा रोंगे ह्या देखील भविष्यात उत्तम प्रकारे दवाखाना चालवून समाजसेवा करतील असा विश्वास आहे.’ असे प्रतिपादन पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले यांनी केले.  

येथील भोसले चौकातील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये पहिल्या मजल्यावर बोहरी हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग व प्रसुतीतज्ञ डॉ. स्नेहा सुरज रोंगे (एम. बी. बी.एस.,एम. एस.(ओबीजीवाय)) यांनी नुकतीच वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू केली असून त्याचे उदघाटन पंढरपूरच्या नगराध्यक्ष सौ.साधनाताई भोसले यांच्या हस्ते झाले. या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकलूज येथील शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य व महाराष्ट्र राज्य प्राचार्य संघाचे अध्यक्ष डॉ.आबासाहेब देशमुख हे होते. प्रास्ताविकात स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी पाहुण्यांचे स्वागत करून स्नुषा डॉ.स्नेहा रोंगे यांच्या वैद्यकीय क्षेत्राविषयी सविस्तर माहिती देत पुढे म्हणाले की, ‘पंढरपुरच्या पंचक्रोशीत डॉ. स्नेहा रोंगे यांना समाजसेवेची संधी दिली असून त्याही प्रचंड कष्टाने, परिश्रमाने समाजसेवा करतील. जिथे नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले ह्या हात लावतील त्याचे सोने होत आहे हा आजचा अनुभव आहे.’ यावेळी नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले यांचा सत्कार स्वेरीच्या विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे यांनी केला. 

श्री संत दामाजी महाविद्यालय, मंगळवेढ्याचे प्राचार्य डॉ.एन. बी. पवार म्हणाले की, ‘ डॉ. बी.पी. रोंगे सरांचे शैक्षणिक कार्य संपूर्ण राज्याला माहित असून त्यांच्या परिश्रमाची, कार्याची प्रेरणा घेवून डॉ. स्नेहा यांनी समाजसेवेचे व्रत हाती घ्यावे आणि आपल्या हातून योग्य समाजकार्य घडावे.’ अशी अपेक्षा व्यक्त केली. स्त्री रोग तज्ञ डॉ. सुजाता गुंडेवार म्हणाल्या, ‘पंढरपूर मधील नागरिक खूप चांगले असून त्यांना मी पंधरा वर्षापासून खूप जवळून ओळखते, अनुभवते. डॉ. स्नेहा यांना प्रॅक्टिस करताना काहीही अडचण येणार नाही. त्यांना सर्वांचे सहकार्य लाभेल. डॉ. आरिफ बोहरी म्हणाले की, ‘प्रामाणिक कार्य केल्यास कोठेही आणि कोणतीही अडचण भासणार नाही. त्यामुळे परिश्रम करणाऱ्या डॉ.स्नेहा यांना निश्चितच या सेवेत यश मिळेल.’ डॉ.स्नेहा रोंगे म्हणाल्या की, ‘मी कष्ट करण्याची पूर्ण तयारी केली असून मनस्वी समाजसेवा करणार आहे. बोलून सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून काम करून सांगण्यावर भर देईन. यासाठी पंढरपुरातील आदर्श डॉक्टरांच्या सहवासाची जोड मिळणार असून यामुळे नवीन प्रेरणा मिळाली आहे.’


 अध्यक्ष स्थानावरून बोलताना शंकरराव मोहिते पाटील  महाविद्यालय, अकलुजचे प्राचार्य डॉ. देशमुख म्हणाले की, ‘मी डॉ.बी.पी. रोंगे परिवाराला खूप जवळून ओळखत असून त्यांच्या प्रत्येक कामातील परिश्रम, जिद्द या बाबी खूप मोलाच्या ठरत आहेत आणि त्यांना मिळालेल्या यशामुळे आज त्यांच्या कार्याचे अनुकरण केले जाते. ‘स्वेरीचे कॉलेज’ ऐवजी ‘रोंगे सरांचे कॉलेज’ अशी ओळख निर्माण झाली असून डॉ. बी.पी. रोंगे सरांच्या परिश्रमामुळे ‘स्वेरी’ आज राज्यात शैक्षणिक विश्वात एक ‘ब्रँड’ बनले आहे. डॉ. बी.पी. रोंगे सरांचे परिश्रम डोळ्यासमोर ठेवून डॉ. स्नेहा रोंगे यांनी कष्ट करावे आणि त्या करतील. डॉ. बी.पी. रोंगे सरांच्या कार्यात टीम वर्कला खूप महत्व आहे. त्याप्रमाणे याठिकाणी डॉ. बोहरी यांचा अनुभव निश्चित सेवा देण्यास मोलाची भूमिका साकारणार आहे.’ प्राचार्य डॉ.एन.बी.पवार यांच्या घरी दोघेजण तर प्राचार्य डॉ.आबासाहेब देशमुख यांच्या घरी अकरा जण डॉक्टर आहेत त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनातून पंढरपुरातील वैद्यकीय क्षेत्राला एक नवी दिशा प्राप्त होणार आहे. यावेळी डॉ.विवेक गुंडेवार, डॉ.अजित गुंडेवार, ड्रगिष्ट अँड केमिस्ट संघाचे प्रशांत खलिपे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शेखर भोसले, निवृत्त पोलीस उपविभागीय अधिकारी शहाजी जाधव, विष्णू कोरके, प्रा.रवींद्र गायकवाड, स्वेरीचे विश्वस्त एच.एम. बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे आणि स्वेरी परिवार यांच्यासह शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील नागरिक, यांच्यासह पंढरपूर मधील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार डॉ. विश्वासराव मोरे यांनी मानले.  


Post a Comment

0 Comments