करकंबमध्ये 50 बेडचे कोविड केअर सेंटर; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सेंटरचे उद्घाटन


 
Pandharpur Live : पंढरपूर दि. 30 :  तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधितांची वाढती संख्या विचारात  घेऊन, करकंब तालुका पंढरपूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये  50 बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी  जिल्हा परिषद सदस्य रणजीतसिंह शिंदे, रजणी देशमुख,  सरपंच तेजमाला पांढरे, माजी सरपंच अदिनाथ देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, नायब तहसिलदार पंडीत कोळी, तालुका वैद्यकीय अधिकारी  डॉ.एकनाथ बोधले उपस्थित होते.

                 पालकमंत्री भरणे म्हणाले, कोरोना बाधित रुग्णांना गावांतच वेळत उपचार मिळावेत यासाठी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असणाऱ्या गावांत कोविड केअर सेंटर उभारण्यात  येणार आहेत.कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुढील काही दिवस अधिक धोक्याचे आहेत. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. विना कारण कोणीही घराबाहेर पडू नये तसेच प्रशासनाने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करावेत.

                  करकंब येथील  कोविड केअर सेंटर येथील कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारसाठी उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रभा साखरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक तुषार सरवदे व आरोग्य कर्मचारी तसेच गावांतील खाजगी डॉक्टर वैद्यकीय सेवा देणार आहेत. ग्रामपंचायती मार्फत वेळोवेळी स्वच्छता करण्यात येणार आहे.  जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक वैद्यकीय साहित्य व इतर गरजेची साधन सामुग्री उपलब्ध करुन देण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने अधिकचे 50 बेडची उपलब्धता करण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments