कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी व लसीकरणावर काम करण्यासाठी केंद्रासह प्रत्येक राज्याने सुरूवात केली आहे. 1 मे पासून देशभरात 18 वर्षावरील सर्वाचं लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लस पुरवठा राज्याला लागणार आहे. मात्र केंद्र सरकारने आधीच साठा बुक केल्याचं सीरम इन्सिट्यूटने सांगितलं आहे.
लस उत्पादनातील 50 टक्के साठा केंद्र सरकारसाठी राखीव आहे. उर्वरित साठा राज्य सरकारला खरेदी करावा लागेल. मात्र 20 मे पर्यंत महाराष्ट्राला लस पुरवता येणार नसल्याचं, सीरम इन्स्टिट्यूट ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगितलं आहे. कारण 20 तारखेपर्यंतचा साठा आधीच केंद्र सरकारने बुक करून ठेवला आहे.
1 मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा चालू होत आहे. मात्र राज्याला 20 मे पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे आता प्रश्न निर्माणा झाला आहे की, नवीन लसीकरणातील 18 ते 45 वयोगटाला लस कधी मिळणार?, हा साठा सर्वांना पुरेल का? असे अनेक सवाल आता उपस्थित झाले आहेत.
यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदींना सवाल केला आहे. 20 मे पर्यंत मोदी सरकारने स्टॉक बुक करून ठेवल्याने राज्याला लस मिळणार नाही असं सीरमने कळवलं आहे. मग 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस कशी द्यायची? हा प्रश्न आहे. कोरोनाच्या इतक्या महिन्याच्या कालावधीत आपण लसीच्या तुटवड्याबद्दल साधी चर्चा करू शकत नाही. मोदीजी, तुमची रणनिती कुठे आहे? असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
देशात लसीचा पुरवठा कसा करायचा यावर पर्याय नाही. मोदी सरकारने 2 कंपन्यांच्या पुरवठ्यावर मर्यादा आणल्या आहेत. आता राज्य सरकारने लस खरेदी करून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस द्यावी असे म्हटले जात आहे. 45 वयोगटावरील नागरिकांबाबत केंद्र सरकार काळजी घेईल. संपूर्ण देशभरात लसीकरण कधीपर्यंत पूर्ण होईल याबाबत तारीख सांगू शकता का? असेही सावंत यांनी पंतप्रधान मोदींना विचारले आहे.


0 Comments