बुधवार पेठेतील महिलेचा खुन करणारा आरोपी अखेर गजाआड; आसामला पळून जातानाच पोलिसांनी आवळल्या मुसक्या!


 
Pandharpur Live Online: बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली. आसामला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच सदर आरोपीच्या मुसक्या फरासखाना पोलिसांनी आवळल्या.  त्याला 72 तासात पकडण्यात यश आले आहे.

मोहम्मद बहरूल हक (रा. सध्या, काळेवाडी, मूळ. आसाम) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यात राणी मन्नाफ शेख (वय 23) हिचा खून झाला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन दिवसांपूर्वीची रात्र पुणेकर अन पोलिसांसाठी थरार घडवणारी ठरली होती. साडे बारा वाजण्याच्या सुमारास एका पोलीस हवालदाराचा चाकूने सपासप वारकरून खून केला होता. बुधवार पेठ परिसरातच ही घटना घडली होती.

वरिष्ठ अधिकारी हे प्रकरण सोडवत असतानाच पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचा खून झाल्याचे समोर आले. यानंतर पोलीस दलात अन शहरात खळबळ उडाली होती. काही तासात एकाच परिसरात दोन खून झाल्याने गोंधळ उडाला होता. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत राणी शेख हिच्या मारेकऱ्याचा शोध सुरू केला होता. त्यावेळी पोलिसांना त्याचे नाव आणि फोटो सापडले होते. पण, तो मिळत नव्हता. त्याच्या शोधावर गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस होते. यादरम्यान पोलिसांना तो आसामला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. मग पोलिसांनी काळेवाडी परिसरात त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने खून केला असल्याची कबुली दिली.

परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, सहाय्यक निरीक्षक अभिजित पाटील, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, सचिन सरपाले, तुषार खडके, वैभव स्वामी, रिजवान जीनेडी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments