Pandharpur Live online :मराठा समाज बांधवांचा संयमाचा बांध फुटलाय म्हणूनचं शंभर टक्के आरक्षणासाठीचा मोर्चा निघणार आहे. 'मराठा आरक्षणासंदर्भात 5 जूनला पहिला मोर्चा बीडमध्ये निघणारच', अशी ठाम भूमिका मराठा नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी घेतली असून या अनुषंगाने बीडमध्ये मोर्चाच्या पूर्वतयारीची बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीला जिल्ह्यातील निवडक मराठा समन्वयकांची हजेरी होती. 'सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर बीडमध्ये मराठा समाजाचा संताप व आक्रोश दाखवण्यासाठी ५ जून रोजी पहिला मोर्चा होत आहे. या मोर्चाची तयारी युद्धपातळीवर सुरू असून ५ तारखेला मोर्चा होणारच', असा ठाम विश्वास मेटे यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवला आहे.
बीड शहरात आज (२३ मे) शासकीय विश्राम गृह या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या पूर्वतयारी बैठकी संदर्भात माहिती देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा व विनायक मेटे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना विनायक मेटे म्हणाले की, '५ जूनला सकाळी १०.३० वाजता मोर्चा बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणार असून या मोर्चाला परवानगी मिळो अथवा नाही पण मोर्चा होणारच असा निर्णय बैठकीत झाला आहे. या वेळी या मोर्चाचे नाव 'मराठा क्रांती संघर्ष मोर्चा, लढा आरक्षणाचा' असे असणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा मोर्चा निघणार आहे.'
'मोर्चा यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. जनजागृतीसाठी ३ टप्पे, बीड शहर- तालुका आणि जिल्हा पातळीवर काम सुरू आहे. जिल्ह्यात प्रचार दौरा वैद्यकीय सेवेसह आजपासून सुरू झाला आहे. यासाठी ९ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. यावेळी मूक मोर्चा नसणार तर संघर्षशील मोर्चा असणार आहे. आमचा आक्रोश मांडणारा मोर्चा, न्याय मागणारा मोर्चा आहे. सर्व पक्षीय, संघटना, या पलीकडे जाऊन मोर्चा निघेल', असेही विनायक मेटे यांनी सांगितले आहे.
'सरकारवर दबाव आणण्यासाठी हा मोर्चा असणार आहे. मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागण्यांसह इतर महत्त्वाच्या मागणीसाठी मोर्चा निघणार आहे तसंच जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तो पर्यंत निकराचा लढा सुरूच राहील', असेही विनायक मेटे म्हणाले.
हा मोर्चा 5 जून रोजी सकाळी 10:30 वाजता जिल्हा स्टेडियम ते जिल्हाधिकारी कार्यालय असा काढला जाणार आहे.यावेळी कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून हा मोर्चा काढला जाईल.सोशल डिस्टन्स पाळला जाणार असून वैद्यकीय सुविधा देखील मोर्चा दरम्यान राहणार आहेत.
दरम्यान मराठा समाजाला न्याय मागणारा हा मोर्चा असेल,हा मोर्चा सर्व, पक्ष, गट, तटाच्या पलीकडे जाऊन सर्वांना सोबत घेऊन काढला जाणार आहे.सर्व पक्षाचे मराठा नेते या मोर्चात येऊ शकतात.हा मोर्चा आता मुकमोर्चा नसून बोलणारा असेल, असा इशारा देखील विनायक मेटे यांनी दिलाय.
0 Comments