कर्नाटकच्या हुबळीहून नागपूरला मासे घेऊन जाणारा ट्रक सोलापुरातील कंबर तलाव परिसरात उलटला होता. यामुळे ट्रकमधील मासे कंबंर तलावच्या परिसरातील सांडपाणीच्या डबक्यात पडले. ते मासे गोळा करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.
Pandharpur Live Online: संपूर्ण देशात बंदी असलेल्या विषारी मांगूर माशांनी भरलेला ट्रक शनिवारी साेलापूरनजीक उलटला होता. यावेळी नागरिकांनी मासे गाेळा करण्यासाठी घटनास्थळावर एकच गर्दी केली हाेती. विशेष म्हणजे हा कर्नाटकहून नागपूरकडे जात हाेता. मात्र या माशांवर बंदी असूनही ट्रकभर मासे नागपूरला का जात हाेते? हा संशयाचा विषय असून, याबाबत सखाेल चाैकशी केली जावी, असे मत मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.
मांगूर हा मासा मानवी आराेग्यास हानिकारक असून, कॅन्सर हाेण्याचीही शक्यता असल्याने केंद्र शासनाने त्याचे मत्स्यपालन व विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र बंदी असूनही ताे सर्रासपणे विकला जाताे, हे कटुसत्य आहे.
नागपूरला जाणारा मांगूर मासे भरलेला ट्रक साेलापूरला उलटल्यामुळे ही चाेरी उघडकीस आली असेच म्हणावे लागेल. मात्र हा ट्रक काेणत्या मासे व्यावसायिकाने मागविला? ताे कशासाठी मागविला? कर्नाटकमधील या माशांचे पुरवठादार काेण? याचा छडा लावणे नितांत गरजेचे झाले आहे.
साेलापूर पाेलिसांनी या प्रकरणात ट्रकचालक आणि त्याच्या सहकाऱ्याला ताब्यात घेतले असून, साेलापूर येथील मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा नाेंदविण्यात आला आहे. दरम्यान, साेलापूर पाेलिसांनी ट्रकचालक व क्लिनरची कसून चाैकशी केली. आपणाला नागपुरात कुणाकडे हे मासे न्यायचे आहेत, हे माहिती नाही. तेथे गेल्यावर ट्रकमालक सांगणार असल्याचे चालकाने सांगितले. मात्र खाण्यासाठी नाही तर औषध कारखान्यात जाणार असल्याचेही ताे म्हणताे. मात्र कुणाकडे जाणार, हे स्पष्ट नसल्याचे व याबाबत पुढची चाैकशी सुरू असल्याचे पाेलिसांनी सांगितले.
0 Comments