छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम; 9 ऑगस्ट 2021 ते 5 जानेवारी 2022 या कालावधीत पंढरपूर विधानसभा मतदार संघात होणार अंमलबजावणी


 
पंढरपूर(दि.30):- भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार 252  पंढरपूर  विधानसभा मतदार संघात 9 ऑगस्ट 2021 ते 5 जानेवारी 2022 या कालावधीत सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली.

सदर कार्यक्रमांतर्गत पुर्व पुनरिक्षण उपक्रम दिनांक  9 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर या  कालावधीत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात दुबार अथवा समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तांत्रिक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेट देवून तपासणी, पडताळणी, योग्यप्रकारे विभाग, भाग तयार करणे आणि मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करण्यात येणार आहे.

पुनरिक्षण उपक्रमांतर्गत एकत्रीत प्रारुप मतदार यादी दिनांक दि.01 नोव्हेबर 2021 रोजी प्रसिध्द करण्यात येईल. दावे व हरकती दि. 01 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत स्विकारण्यात येतील.  विशेष मोहिमांचा कालावधी हा  दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी निश्चित केलेले दिवस राहील. दावे व हरकती दिनांक 20डिसेंबर 2021 रोजी  निकालात काढण्यात येतील. तसेच 5 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे  तहसीलदार बेल्हेकर यांनी सांगितले.

मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्राकरीता त्यांच्या मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्याची (बूथ लेव्हल एजन्ट- बीएलए) नेमणूक करावी आणि शासनाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बूथ लेव्हल ऑफीसर- बीएलओ) यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ही श्री. बेल्हेकर यांनी यावेळी केले. यावेळी नायब तहसीलदार सुरेश तिटकारे व निवडणूक संकलन महसूल सहाय्यक राहुल शिंदे उपस्थित होते.

Pandharpur Live Contact information
Mobiles : 7972287368, 8308838111
Mail: livepandharpur@gmail.com


Post a Comment

0 Comments