फेरीवाल्याचा महिला पालिका अधिकाऱ्यांवर कोयत्याने हल्ला!

  

  

Pandharpur Live Online: अनधिकृतपणे रस्ता अडवून भाजीविक्री करणाऱया फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे पालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर मुजोर फेरीवाल्याने कोयत्याने हल्ला केला.

ही घटना सायंकाळी 6 वाजता कासारवडवली येथे घडली. हा हल्ला इतका जीवघेणा होता की त्यात पिंपळे यांची दोन बोटे तुटून रस्त्यावर पडली. त्यांच्या आणखी एका बोटाला आणि डोक्यालाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या बचावासाठी पुढे सरसावलेल्या अंगरक्षकाचेही बोट तुटले आहे. जखमी कल्पिता पिंपळे व अंगरक्षकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. भररस्त्यात झालेल्या या रक्तरंजित थरारामुळे ठाण्यात प्रचंड खळबळ उडाली असून हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे.

घोडबंदर रोड येथील कासारवडवली परिसरात कल्पिता पिंपळे आज सायंकाळी पथकासह फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी या कारवाईला विरोध करत अमरजितसिंग यादव हा फेरीवाला कोयता हातात घेऊन त्यांच्या अंगावर धावून गेला. काही कळायच्या आतच यादवने पिंपळे यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची दोन बोटे तुटून रस्त्यावर पडली तर त्यांच्या आणखी एका बोटाला दुखापत झाली आहे. 

त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या त्यांच्या अंगरक्षकावरही यादवने कोयत्याने वार केल्याने त्यांचे बोट तुटले आहे. या दोघांनाही आधी घोडबंदर रोड येथील वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले. ठाणे पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी धाव घेत पिंपळे यांची भेट घेतली. त्यांना पुढील उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात हलवले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या मुजोर हल्लेखोरालाही ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

महिन्याभरापूर्वी लोकमान्यनगर - सावरकरनगर प्रभाग समिती येथून बदली होऊन कल्पिता पिंपळे यांनी माजिवडा - मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त पदाचा चार्ज स्वीकारला होता. त्यानंतर घोडबंदर रोड व ओवळा परिसरातील लेडीज बारवर त्यांनी कारवाईचा बडगा उगारला होता. या भागातील फेरीवाल्यांवर कारवाई करून रस्ते मोकळे करण्यात पिंपळे आघाडीवर होत्या. मात्र त्यांच्यावरील हल्ल्याने पालिका वर्तुळासह ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.

काही वेळाने हाती आलेल्या माहितीनुसार  हल्ला करणाऱ्या फेरीवाल्यास पोलिसांनी अटक केली असून अमरजीत यादव असे त्याचे नाव आहे. सोमवारी पिंपळे यांचे पथक घोडबंदरच्या कासारवडवली येथील मुख्य मार्केटमध्ये पदपथ आणि रस्ते अडविणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेले होते. सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही कारवाई सुरू होती. त्याच वेळेस एका फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी पथक पुढे सरसावत असतानाच संतप्त झालेल्या यादव याने रागाच्या भरात पिंपळे यांच्यावर चाकूहल्ला केला. त्याने त्यांच्या डोक्यावर चाकू भिरकवला असता बचाव करण्यासाठी पिंपळे यांनी डोक्यावर हात ठेवला, त्यात त्यांच्या डाव्या हाताची दोन बोटे तुटून खाली पडली.

सदर घटनेवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. परप्रांतीय फेरीवाल्यांची मस्ती उतरावयालच हवी, असं राज ठाकरे यांनी सांगितले. तसेच आजपर्यंत कोणी असं अधिकाऱ्यांवर हल्ला केली नव्हता. आज हल्ला केलाय आणि त्याला पोलिसांनी अटक केली. उद्या तोच जामिनावर सुटेल व पुन्हा हल्ला करायला मोकळा असेल, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. मात्र ज्या दिवशी हल्लाखोर फेरीवाला जेलमधून बाहेर येईल, त्याचदिवशी त्याला मनसैनिक चोप देतील. भीती काय असते ते त्याला दाखवून देऊ, असा इशारा राज ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला.

Post a Comment

0 Comments