Video News Updates Pandharpur Live
....................
.................
................
Pandharpur Live Online: सिंधुदुर्ग जिल्ह्यात संचारबंदी लागू झाली तरीही जनआशीर्वाद यात्रा चालू होणार. काय करता बघू, असं थेट आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलं आहे.
मंगळवारी रात्री उशिरा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाड कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नारायण राणे यांना जामीन देण्यात आलाय. मात्र, 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबरला रायगड गुन्हे शाखेत नारायण राणे यांना हजेरी लावावी लागणार आहे. अशातच कागदपत्रे आणि पुराव्यांसोबत छेडछाड करता येणार नसल्याचं महाड कोर्टानं राणेंना बजावलं. जामीन मिळाल्यानंतर रात्री 12 च्या सुमारास राणे कोर्टाच्या बाहेर आले. मात्र त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली नाही.

यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. प्रवीण दरेकर यांनी राणेंच्या पुढील कार्यक्रमासह जन आशीर्वाद यात्रेची माहिती दिली आहे. गुरुवारपासून पुन्हा भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरू होणार असल्याची माहिती दरेकरांनी दिली.

नारायण राणे आता मुंबईला जाणार. तिथे एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर ते गुरुवारपासून रत्नागिरीमधून पुन्हा जन आशीर्वाद यात्रा सुरु करतील, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली. नारायण राणे सपत्नीक मुंबईला रवाना झालेत. तिथे राणे यांच्या प्रकृतीची तपासणी केली जाणार असल्याचं दरेकरांनी यावेळी सांगितलं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात संचारबंदी नारायण राणेंच्या अटकेनंतर राणे कुटुंबाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली. नारायण राणे यांच्या अटकेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतला. जिल्ह्यात मंगळवारी रात्री 12 पासून 7 दिवसांची संचारबंदी लावण्यात आली.

राणेंवरील कारवाई सुडबुद्धीने : चंद्रकांत पाटील
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याचा प्रयत्न ही सुडबुद्धी आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केली. 'नियम ध्यानात घेता राणे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांना अटक करता येणार नाही. तरीही कोकणात जन आशीर्वाद यात्रेला मिळणारा प्रतिसाद रोखण्यासाठी राजकीय हेतूने अटक करण्याचे वातावरण निर्माण केले जात आहे,' असा आरोप त्यांनी केला.
पाटील हे पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, 'नारायण राणे यांनी काही बोलल्यानंतर त्याला विरोधक उत्तर देऊ शकतात. परंतु, एखाद्या वाक्याच्या आधारे केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याला थेट अटक करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे राज्य सरकारच्या कायद्याच्या ज्ञानाबद्दलच शंका निर्माण करणारे आहे. महाविकास आघाडी सरकारने सातत्याने न्यायालयाकडून थपडा खाल्या आहेत, तशा या प्रकरणातही बसतील. राणे यांची बोलण्याची एक शैली आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे.'


0 Comments