Pandharpur Live :Bhagwan Wankhede:)तब्बल 50 वर्षाच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत स्वच्छ आणि पारदर्शी कारभारभारामुळे 'आदर्श राजकीय नेता', 'सहकारातील डॉक्टर', 'राजकारणातील संत' अशी अनेक बिरूदावलं जनसामान्यांकडून लाभलेले माजी आमदार (स्व.) कर्मयोगी सुधाकरपंत यांचा आज प्रथम पुण्यस्मरण दिन.
महाराष्ट्रातील राजकीय इतिहासात एक स्वच्छ व पारदर्शी नेतृत्व म्हणून आपल्या नावाचा अमिट ठसा कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांनी उमटविलेला आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी राजकारण करणारे जनसामान्यांच्या हृदयात 'प्रतिपांडुरंग' म्हणून सदैव जिवंत राहणारे ऋषितुल्य नेतृत्व सुधाकरपंत परिचारक यांनी आपल्या तडफदार कामगिरीतून पंढरपूर तालुक्याचा आणि सोलापूर जिल्ह्याचा चेहरामोहराच बदलून टाकला. सुधाकरपंत परिचारक यांनी सहकार क्षेत्रात किमया करून खासगी साखर कारखान्यांचे आजारी साखर कारखाने सहकारात आणले. पंढरपूर तालुक्यात भीमा साखर कारखाना, पांडुरंग साखर कारखाना या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सहकार क्रांती घडवली, सहकारी सोसायट्या, दुध संघ आदी सहकारी संस्थांचे जाळे निर्माण करून त्यांनी शेतक-यांच्या जीवनात सोनेरी क्षण आणले. गावागावात, वाड्या वस्त्यांवर विकासाची गंगा त्यांच्यामुळेच पोहोचली.
सुधाकरपंत परिचारक जे बोलत असतं तेच कार्य प्रत्यक्षातही करुन दाखवित असतं. सुधाकरपंत परिचारक यांचं मुळ गाव पंढरपूर पासून अगदी जवळ असणारं खर्डी हे गाव. संत सिताराम महाराजांच्या पदस्पर्शानी पावन झालेल्या खर्डी गावाने एक निस्पृह असा नेता साऱ्यांनाच दिला. सात्विक आचरण... अध्यात्माचा अभ्यास ..शांत नी संयमी वृत्ती...त्यामुळेच सुधाकर परिचारक यांना 'राजकारणातील संत' ही उपाधी देण्यात आली. विठ्ठलाच्या मंदिराजवळच असणाऱ्या परिचारक यांच्या वाड्यामध्ये कायमच कार्यकर्त्यांची वर्दळ असे . पांडुरंगाच्या दर्शनानंतर सुधाकरपंत परिचारक यांच्या पायावर डोकं टेकवूनच दर्शन घेऊन मगच लोक पुढे जात असतं.परिचारकांच्या कार्याविषयी सांगायचे झालेच तर पांडुरंग सहकारी साखर कारखाना, पंढरपूर अर्बन बँक , भीमा सहकारी साखर कारखाना , युटोपियन शुगर्स, उमा महाविद्यालय, कर्मयोगी विद्यानिकेत, कर्मयोगी इंजिनीअरिंग कॉलेज, दामाजी सहकारी साखर कारखाना, पंढरपूर तालुक्यातील ६० विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या, दूध उत्पादन संघ अशा अगणित उद्योग समुहाच्या माध्यमातून हजारो लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला. परिचारकांच्याच अथक परिश्रमामधुन संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात सहकार क्षेत्राचे मोठे जाळे विणले गेले.
सुधाकर परिचारकांनी सोलापूर जिल्ह्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या बरोबर कार्य केले आहे. स्व. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील , नामदेवराव जगताप , भाई एस.एम.पाटील , रतनचंद शहा , बाबुराव आण्णा अनगरकर , कि.रा.मर्दा मारवाडी वकील , बबनराव शिंदे , दिलीप सोपल , शेकापचे गणपतराव देशमुख , माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील ,अशा अगणित लोकांबरोबर अतिशय जिव्हाळ्याचे नाते जोडत सर्वांना सोबत घेऊन त्यांनी जनसामान्यांच्या हिताचं राजकारण साधलं.
आज कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांचा समृध्द वारसा जपत आ. प्रशांत परिचारक, युवानेते उमेश परिचारक, प्रणव परिचारक हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत.
...................................................
एस. टी. महामंडळाचे अध्यक्षपद भुषवुन तोट्यात असलेले महामंडळ, नफ्यात आणणारे, दामाजी साखर कारखान्यासारख्या बंद पडलेल्या संस्था उभारणेसाठी निःस्पृह वृत्तीने झटणारे सुधाकरपंत परिचारक हे त्यामुळेच सहकारातील डॉक्टर म्हणून ओळखले जात.
प्रतिपांडुरंग म्हणून सर्वसामान्यांच्या मनात वसलेले हे श्रध्दास्थान कोरोनाशी लढत असताना अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना सुरू होत्या परंतू अखेर नियती कठोर झाली आणि लाखोंच्या काळजाला चटका लावून कर्मयोग्याने आपली इहलोकीची यात्रा संपवली.
आज जरी देहरूपाने कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक हयात नसले तरी त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या रूपाने आणि त्यांनी निर्माण केलेल्या समृध्दीच्या रूपाने जनसामान्यांच्या मनामनात ते कायम जिवंत राहतील.'पंढरपूर लाईव्ह' कडून त्यांच्या चिरंतन स्मृतीस विनम्र अभिवादन.
.........................................
..................
...........................
0 Comments