Pandharpur Live Online: तालुका पोलिस ठाण्यासमोर नाकाबंदी लावलेल्या पोलिसाच्या अंगावर आरोपींनी वाहन घातले व पोलिसाच्या वाहनाला धडक देऊन 55 हजारांचे नुकसान केले. याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले तर अंधाराचा फायदा घेऊन दोघेजण पसार झाले आहेत.
पानगाव (ता. बार्शी) पासून बार्शी तालुका पोलिस ठाण्यापर्यंत हातभट्टीची दारू घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग केला असता आरोपींनी हा हल्ला केला असल्याचे समजते.

राम देविदास राठोड, मुकुंद श्रीकुंभ जाधव यांना अटक करण्यात आली आहे तर अजय शिवाजी राठोडसह एक अनोळखी पसार झाला आहे. सर्वजण रा. बक्षीहिप्परगा तांडा, ता. उत्तर सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिस हवालदार धनराज केकान यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना शुक्रवारी (ता. 27) रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान घडली.

पोलिसांना बक्षीहिप्परगा येथून अवैधरीत्या हातभट्टीची दारू बार्शी तालुक्यात वाहनाने येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पानगाव येथील चौकात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली होती. पानगाव येथे पोलिसांनी जीप (क्रमांक MH 12 FY 2931) थांबवण्याचा प्रयत्न केला असता वाहन थांबले नाही. पोलिसांनी पाठलाग सुरू केला. जीप पुढे व पोलिस पाठीमागे अशा परिस्थितीत ही जीप कुर्डुवाडी रस्त्याने जाऊन लातूरकडे बाह्यवळण रस्त्याकडे गेली. याच रस्त्यावर तालुका पोलिस ठाणे असल्याने पोलिसांनी फोन करून पोलिस ठाण्यासमोर सापळा लावला. वाहन येताच उभारलेल्या पोलिस शेलार यांच्या अंगावर जीप घालण्याचा प्रयत्न झाला तर लावलेल्या बॅरिकेडिंगला जीपने धडक देऊन पोलिसाच्या कारला (क्रमांक MH 14 G 1670) धडक दिली व 55 हजारांचे नुकसान केले.

अपघातानंतर जीप खड्ड्यात जाऊन थांबली. त्यातील अकरा ट्यूबमधील अकराशे लिटर (किंमत 60 हजार रुपये) हातभट्टी दारू, सहा लाखांची जीप पोलिसांनी जप्त केली आहे. चौघेजण अंधाराचा फायदा घेऊन पळून जात असताना पोलिसांनी दोघांना पकडले असून, दोघे पसार झाले आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करीत आहेत.


0 Comments