प्रतीकात्मक छायाचित्रं
Pandharpur Live Online: आता दारू खरेदीसाठी कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. हे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच दारू खरेदी करता येणार आहे. तामिळनाडूच्या निलगिरी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सरकारी मद्यविक्री करणाऱ्या दुकानात लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दाखवणाऱ्यांनाच मद्यविक्री केली जाणार आहे. या निर्णयामुळे लसीकरण मोहिमेला गती मिळणार असून याबाबतची जनजागृती होणार आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकारी इनोसेंट दिव्या यांनी सांगितले.

निलगिरी हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. कोरोना निर्बंधामध्ये सूट देण्यात आल्यानंतर आता निलगिरीमध्ये पर्यटकांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पर्यटकांच्या सुरक्षेवर विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे दिव्या यांनी सांगितले. आता निर्बंधांमध्ये सूट देण्यात आल्यानंतर निलगिरीसह राज्यातील इतर ठिकाणीही पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

अजूनही काही नागरिकांमध्ये कोरोना लसीबाबत संभ्रम आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. लोकांमधील लसीबाबतची भिती दूर करण्यासाठी आणि त्यांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. कोरोना लसीबाबत भीती असल्याने अनेकजण लस न घेता मद्यसेवन करत आहेत. त्यातील अल्कोहोलमुळे कोरोनाची लागण होणार नाही, असा गैरसमजही काही लोकांमध्ये आहे. त्यामुळे असे गैरसमज दूर करून लसीकरणाला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

लोकांनी कोरोना लसीबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, याबाबत काही गैरसमज असल्यास हेल्पलाईनवरील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य ती माहिती घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. निलगिरीमध्ये पर्यटकांमध्ये वाढ झाली असून मद्यविक्रीतही वाढ झाली आहे. त्यामुळे आता सरकारी मद्यविक्रीच्या दुकानात लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दाखवल्यावरच मद्य मिळणार आहे.
निलगिरीमध्ये 97 टक्के लसीकरण करण्यात आले आहे. मात्र, काहीजण कोरोनाची लस न घेता मद्यसेवन करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच याबाबत नागरिकांमध्ये असलेल्या गैरसमजांबाबतही माहिती मिळाली आहे. त्यामुळे लसीकरणाच्या जनजागृतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असलेल्या पर्यटकांना आणि स्थानिकांनाच आता मद्य खरेदी करता येणार आहे.

0 Comments