किल्लारी (जि. लातूर) : शेतकरी व त्याच्या मुलाने शेतातील वाळू उपसा करण्यास विरोध केल्याने चौघांनी शेतकऱ्याच्या मुलास मारहाण करुन ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटना किल्लारी येथे घडली.
पोलिसांनी सांगितले, किल्लारी येथील बाळू चंद्रकांत बिराजदार यांची तेरणा नदी काठावरील सर्व्हे क्र. १९८ मध्ये शेती आहे. ते सोमवारी शेतात काम करीत होते. तेव्हा आरोपी महादू शशिकांत पांढरे, सुधाकर सहदेव दंडगुले, दिलीप दंडगुले, मधुकर दंडगुले हे संगनमत करुन आले आणि फिर्यादी बाळू बिराजदार यांच्या शेतातील वाळू अवैधरित्या उपसा करण्याचा प्रयत्न सुरु केला. तेव्हा शेतकऱ्याने अडविले असता त्या चौघांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, शेतकऱ्याने मुलगा रामानंद यास बोलावून घेतले.
तेव्हा त्याने चौघांना असे का करता म्हणून विचारले असता आरोपींनी वाळू का घेऊन जाऊ देत नाहीस म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच ट्रॅक्टरखाली ढकलून चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रामानंद गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी बाळू चंद्रकांत बिराजदार यांच्या फिर्यादीवरुन किल्लारी ठाण्यात मंगळवारी चौघा आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. अधिक तपास सपोनि. सुनील गायकवाड हे करीत आहेत.
0 Comments