उज्वल करिअरसाठी कोणतेही क्षेत्र उत्तम, पण कठोर परिश्रम आवश्यक






उज्वल करिअरसाठी कोणतेही क्षेत्र उत्तम, पण कठोर परिश्रम आवश्यक

                                                                                  -स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे

२४ जून रोजी ‘लहर’ राज्यभर प्रदर्शित होणार

पंढरपूर- ‘लॉजिक निर्माण करणारे, त्या प्रमाणे वागणारे व लॉजिकच्या आधारे शिक्षण घेणारे या तिन्ही मध्ये जमीन अस्मानचा फरक असून चित्रपट क्षेत्र हे लॉजिक पेक्षाही भावनेच्या आधारावर अधिक चालते. त्यामुळे या चित्रपट क्षेत्रात नेहमी चढ-उतार होत असतात. मात्र या पदावर जाण्यासाठी प्रचंड रिस्क आहे. सध्या अनेक सिनेमे निर्माण होत आहेत परंतु समाजावरील ज्वलंत विषय घेऊन चित्रपट निर्माण झाला आहे अशी खूप कमी उदाहरणे आहेत. त्यातून सामाजिक घटनाही चित्रपटाचा विषय बनतो. ‘मन वढाय वढाय......’ या बहिणाबाईंच्या गीताप्रमाणे हे क्षेत्र आहे. एकूणच यात वाहवत न जाता  आपले ध्येय साध्य करण्यासाठी, करिअर उज्वल बनविण्यासाठी त्या क्षेत्राची आवड असो अथवा नसो परंतु भविष्य उज्वल होते याची खात्री असेल तर उत्तम करिअर करण्यासाठी जे करायला हवे ते केलेच पाहिजे. यासाठी प्रामाणिकपणा व परिश्रमाची तयारी ठेवणे आवश्यक आहे. अभिनय आणि कला क्षेत्रात पाऊल टाकलेल्या आप्पा चव्हाण यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात दुसरे नागराज मंजुळे मिळाले.’ असे प्रतिपादन  स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी केले. 



         गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉल मध्ये आयोजिलेल्या ए.ए.चव्हाण मुव्हीज् निर्मित ‘लहर’ या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉचिंग कार्यक्रमाप्रसंगी उदघाटक म्हणून स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव कागदे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रास्ताविकात भारत मोरे यांनी ‘लहर’ चित्रपटाची पार्श्वभूमी सांगून ‘हा चित्रपट वास्तववादी असून समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराजांच्या प्रेरणेतून साकारलेला हा चित्रपट आहे आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून पाहण्यासारखा आहे. एकूणच चित्रपट कसा असावा हे पाहण्यासाठी येत्या २४ जून रोजी जवळच्या चित्रपटगृहात जाणे योग्य ठरेल.’ असे प्रतिपादन केले. निवृत्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विश्वासराव मोरे यांनी चित्रपटाच्या कथानाकासंबंधी विश्लेषण करून ग्रामीण भागातील होतकरू कलावंत आप्पा चव्हाण यांनी चित्रपट निर्माण करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाची माहिती दिली. पुढे बोलताना डॉ. रोंगे म्हणाले की, ‘एकूणच करिअर करताना भावनेच्या लाटा मध्ये विद्यार्थ्यांनी वाहून न जाता वस्तुस्थितीचे भान राखून करिअर उज्वल होत असेल तर ते क्षेत्र आपल्याला आवडो अथवा न आवडो त्यात परिश्रम करावे.’ असे सांगून चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. ‘लहर’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण पंढरपूर, गोपाळपूर, आढीव, बाभूळगाव, रोपळे, येवती, भटुंबरे, विसावा, शेगाव दुमाला, शिर्डी आदी परिसरात झाले असून यामध्ये अभिनेता म्हणून भूषण काटे तर अभिनेत्री म्हणून श्रुती पवार यांनी काम पाहिले आहे. ग्रामीण भागातील कलावंतांना यात स्थान दिले असून अभिनयाबरोबरच संवाद देखील लक्षवेधी आहेत. ‘लहर’ मध्ये तीन श्रवणीय गीते असून ती समीर माने व आनंद ओक यांनी  लिहिली आहेत तसेच ही गीते आनंद ओक यांनी संगीतबद्ध केली आहेत. दिग्दर्शन शशिकांत मेना यांनी केले असून, चित्रपटाचे कॅमेरामन अब्दुल रहमान शेख, पटकथा संवाद समीर माने, संकलन कमाल सहगल, रंगभूषा दत्तात्रय जगताप यांनी केली आहे. एकूणच वास्तववादी प्रेमकथा असलेला ‘लहर’ चित्रपट एकदा तरी चित्रपटगृहात जाऊन पाहण्यासारखा आहे, असेच चित्रपटाचा ट्रेलर पाहून लक्षात येते. यावेळी प्रसिद्ध बागायतदार व भगवंत उद्योगसमूहाचे प्रमुख चंदूकाका देशमुख, अभिनेता भूषण काटे, सचिन अढवळकर, शिवराज सरनाईक, दीपक चव्हाण, आप्पासाहेब चव्हाण, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनकर चव्हाण, निवृत्त मेजर एकनाथ चव्हाण, राजाराम चव्हाण, डी.व्ही.पी. समूहाचे कदम, स्वेरीचे उपाध्यक्ष अशोक भोसले, स्वेरीचे जेष्ठ संस्थापक विश्वस्त दादासाहेब रोंगे, स्वेरीच्या विश्वस्त सौ. प्रेमलता रोंगे, सौ. सुनंदा कागदे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर चित्रपटाचे निर्माते आप्पा चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानून चित्रपट पाहण्याचे आवाहन केले.

Post a Comment

0 Comments