पंजाबमधील प्रसिद्ध गायक व काँग्रेस नेता सिद्धू मूस वाला याची मनसा जिल्ह्यातील जावाहरके येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सिद्धू मूस याची पोलीस सुरक्षा काढून घेतल्याच्या दुसऱ्या दिवशीच त्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
शुभदिप सिंग सिद्धू असे त्याचे खरे नाव असून तो सिद्धू मूस वाला या नावाने पंजाबमध्ये प्रसिद्ध आहे. तो त्याच्या मित्रांसोबत जीपमधून जात असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात मूसवाला गंभीर जखमी झाला तर त्याचे दोन मित्र किरकोळ जखमी झाले. त्या तिघांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे पोहोचताच डॉक्टरांनी मूसवाला याला मृत घोषीत केले.
29 वर्षीय सिद्धू याने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर त्याने 2022 मध्ये मनसा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्याचा पराभव झाला होता. सिद्धू मूस वाला याच्या हत्येने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. काँग्रेस नेत्यांनी ट्विट करत मूसवालाला श्रद्धांजली वाहिली आहे.



0 Comments