स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी केली बेगमपूरच्या किल्ल्याची स्वच्छता
‘मेसा’ तील विद्यार्थ्यांचा उपक्रम
पंढरपूर- ‘पर्यावरण जनजागृती व स्वच्छता सप्ताह’ निमित्ताने ‘माझी वसुंधरा’ या उपक्रमाच्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आणि गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने घोडेश्वर (ता.मोहोळ) ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या ऐतिहासिक बेगमपूर किल्ल्याची स्वच्छता करून तसेच पर्यावरणाविषयी जनजागृती करून पुरातन वास्तु व ऐतिहासिक किल्ल्याचे जतन करणे भविष्याच्या दृष्टीने गरजेचे आहे, हे स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी पटवून दिले.
या उपक्रमात स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या मेसा (मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन) मधील जवळपास १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन पहिल्यांदा बेगमपूर किल्ल्याची स्वच्छता करण्यास सुरवात केली. किल्ल्यावर कागद, प्लास्टिक, काचा, जुने जीर्ण झालेले कपडे, कचरा आदी मोठ्या प्रमाणात होता. झाडू, खोऱ्या, कुदळ, फावडे, टोपली आदींचा वापर करून अल्पावधीत हा परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले तसेच पुढच्या पिढीचा विचार करून ऐतिहासिक किल्ल्यांची जपणूक करणे काळाची गरज असल्याचे विद्यार्थ्यांनी पटवून दिले. स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी हातात झाडू, टोपली घेवून आपण भावी अभियंते, भावी प्रशासकीय अधिकारी असल्याचे विसरून ऊन पावसात परिसर स्वच्छ करून एक आदर्श घालून दिला, याचे सर्वत्र कौतुक होत आहे. अखेर सायंकाळ पर्यंत संपूर्ण किल्ला व परिसर स्वच्छ केला. अनेक नागरिक पर्यटन व ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात पण त्यानंतर खाद्य पदार्थाबरोबर आणलेले कागद, कपडे, प्लास्टिकच्या बाटल्या नकळत तिथेच टाकून जातात. पर्यायाने निसर्गाची हानी होण्यास तेथून सुरवात होते.हे लक्षात येत नाही. जो ऐतिहासिक किल्ला मिळविण्यासाठी शुर-वीरांना अत्यंत परिश्रम घ्यावे लागले, रक्त सांडावे लागले त्याच ठिकाणी अशी नकळत घाण करणे म्हणजे खूप अशोभनीय कृत्य आहे. यासाठी आत्ताच त्याची जपणूक करणे गरजेचे आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम.पवार यांच्या सहकार्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.संदीप वांगीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.सुभाष जाधव, प्रा.संदीपराज साळुंखे, प्रा. दिगंबर काशीद, प्रा.बाळासाहेब गडदे आणि प्रा.पोपट आसबे यांच्या सहकार्याने मेसातील विद्यार्थ्यांनी किल्ला परिसर स्वच्छ केला. किल्ल्याची स्वच्छता करून उत्तम कार्य केल्याबद्धल स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी स्वच्छता करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कुलदीप पुकाळे यांनी केले तर समारोप प्रा. संजय मोरे यांनी केला.



0 Comments