पंढरपूर तालुक्यातील युवकाचा अनैतिक संबधातून खुन करुन मृतदेह पुणे-सोलापूर जिल्हाच्या सिमेवरील नीरा नदीमध्ये टाकणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यामध्ये वालचंदनगर पोलिसांना यश आले आहे.
४८ तासामध्ये अनोळखी इसामाच्या खुनाचा तपास करुन पोलिसांनी पाच जणावर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली.
या घटनेमध्ये विकास संभाजी पाखरे (वय २७, रा. बादलकोट, पो. करकंभ, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) या युवकाचा अनैतिक संबधातून खुन करण्यात आला आहे. याप्रकरणी नवनाथ श्रीधर नवले, सचिन श्रीधर नवले, महेंद्र आटोळे, दादा हजारे, साधना नवले
(सर्वजण रा. बादलकोट, पो. करकंब, ता.पंढरपूर, जि. सोलापूर) यांच्यावर वालचंदनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार विकास पाखरे हा टेंम्पो मालक व चालक होता. तो दररोज बारामती ते मंगळवेढा या रस्त्याने बारामतीहुन पशुखाद्याची वाहतुक करीत होता.
त्याचे गावातील एका महिलेबरोबर अनैतिक संबध असल्याचा संशय वरील आरोपींना असल्याने त्यांनी शुक्रवार (ता. १०) जून रोजी रात्रीच्या वेळी विकास याचा खुन करुन त्याच्या हात -पाय दोरीच्या साहय्याने सिमेंटच्या खांबाला बांधले. व मृतदेह पुणे व सोलापूर जिल्हातील सिमेवरील कुरवली गावाजवळील नीरा नदीच्या पुलावरुन नदीमध्ये फेकुन दिला.
रविवार (ता. १२) रोजी सकाळी पुणे व सोलापूर जिल्हातील नागरिकांना नीरा नदीच्या पात्रामध्ये मृतदेह तरंगत असल्याचे दिसल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले. वालचंदनगर पोलिसांनी तातडीने अनोळखी मृतदेह पाण्याबाहेर काढून तपासाला सुरवात केली.
खुनाचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना आल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून ४८ तासाच्या आतमध्येच मृतदेहाची ओळख पटवून खुनाचा छडा लावला. पुणे जिल्हाचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक बिरप्पा लातुरे, उपपोलिस निरीक्षक अतुल खंदारे, साहय्यक फौजदार शिवाजी निकम, बाळासाहेब पानसरे, रविंद्र पाटमास, अजित थोरात, प्रमोद भोसले, अभिजित कळसकर, शैलेश स्वामी, मोनिका मोहिते यांनी तपास करुन ४८ तासाच्या आत खुनाचा छडा लावला.



0 Comments