कोल्हापूर – अनेकदा प्राणी हल्ले करतात. पण मांजराने हल्ला (Cat attack) केल्याचं क्वचित ऐकायला मिळतं.
मांजर चावत असल्याने गावात धुमाकूळ
पन्हाळा तालुक्यातील पोखले गावात ही घटना घडली आहे. जखमी झालेल्या नागरिकांवरती कोडोलीच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. काल सकाळच्या सुमारास सुभाष पाटील हे कामानिमित्त घरातून बाहेर निघाले होते. त्यावेळी रस्त्याने चालत असताना मागून आलेल्या मांजराने त्यांच्यावरती हल्ला केला. त्यावेळी मांजराने त्यांच्या पायाला दोन ठिकाणी चावा घेतला. पाटील यांनी हल्ला होताचं आरडाओरड केल्याने मांजराने तिथून पळ काढला. त्यानंतर पिसाळलेले मांजर एका गल्लीत शिरले. तिथं त्याने विमल पाटील यांना चावा घेतला. आत्तापर्यंत शहाजी पाटील, सुरेखा पाटील, विमल पाटील, दिनकर जाधव यांना जखमी केले असून सगळ्यांवरती उपचार सुरू आहेत.
शेजारी शाळा असल्याने नागरिक चिंतेत
पिसाळलेले मांजर नागरिकांच्यावरती अचानक हल्ला करीत आहे. मांजर शरिराने धिप्पाड आहे. हल्ला केल्यानंतर घराच्या वरच्या बाजूला मांजर जात असल्याने त्याला पकडणं अवघड झालं आहे. ज्या गल्लीत मांजर आहे, तिथं शेजारी शाळा असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
मांजराला लवकरात लवकर पकडावे अशी मागणी गावातील रहिवाशांनी केली आहे.



0 Comments