स्वेरीत '३४८ वा शिवराज्याभिषेक दिन' साजरा



Pandharpur Live News:

शिवछत्रपतींच्या गौरवशाली इतिहासाचे वाचन करणे आवश्यक 

                                                                                         - स्वेरीचे सचिव डॉ.बी.पी.रोंगे

स्वेरीत '३४८ वा शिवराज्याभिषेक दिन' साजरा

पंढरपूर– ‘इतिहासात दि.०६जून रोजी हिंदुस्थानच्या मातीत एक अदभूत सोहळा झाला तो म्हणजे ‘शिवराज्याभिषेक सोहळा’. छत्रपती शिवाजी महाराजांनी अजोड रणनीती आणि कर्तबगार मावळ्यांच्या सहकार्याने मोठ्या चलाखीने आणि बुद्धी चातुर्याने स्वतःची व स्वतःच्या मुलाची आणि सोबतच्या मावळ्यांची सुटका करून घेतली. आग्र्याच्या सुटकेनंतर जराही उसंत न घेता स्वराज्याची स्थापना करून त्याचा पुढे विस्तार केला आणि त्यानंतर छत्रपतींच्या स्वराज्याचा वारू चौफेर उधळत राहिला. त्यानंतरचा इतिहास संपूर्ण विश्वाला माहितच आहे. छ्त्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा गौरवशाली आहे. तो केवळ सांगून, ऐकून समजणार नाही तर तो वाचावाच लागतो. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि यशोगाथा जाणून घेण्यासाठी शिवचरित्राचे वाचन करणे गरजेचे आहे.’ असे प्रतिपादन स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले.



         गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगमध्ये रयत प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ‘३४८ वा शिवराज्याभिषेक दिन' साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवरायांच्या शौर्याच्या कामगिरीवर स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे हे प्रकाश टाकत होते. प्रारंभी स्वेरी अभियांत्रिकीच्या प्रवेशद्वाराजवळ भव्य अशा शिवमुर्तीचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे पुढे म्हणाले की, ‘३४८ वर्षापूर्वी आजच्याच दिवशी, दि. ६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. त्यांच्या मातोश्री जिजाऊसाहेब या त्यांचे चालते बोलते विद्यापीठच होत्या. बालवयात असलेली विचारांची प्रगल्भता व जाण या गोष्टींची त्यांना मातोश्रींकडून शिकवण मिळाली होती. महाराजांनी कोवळ्या वयात सर्व जाती-जमातींना एकत्रित घेऊन स्वराज्याची शपथ घेतली. त्या काळात बलाढ्य अशा आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही या सर्व प्रस्थापित सत्तांना लढा देत हिंदवी स्वराज्य स्थापन करून त्यादृष्टीने वाटचाल केली. सामान्य माणूस ज्या गोष्टींची कल्पनाही करू शकत नाही, अशा गोष्टी महाराजांनी सत्यात उतरविल्या. त्यांच्या कार्यातील उत्साह, बहारदार असलेले नेतृत्व, कोणताही मुलाहिजा न ठेवता केलेला न्याय, शत्रूंच्या विरोधी कराव्या लागलेल्या लढायांमधील कौशल्य, सुसंवाद, आदर, संस्कार, कामातील एकसूत्रीपणा, नियोजन अशा विविध पैलूंचा अभ्यास करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पुस्तकांचा अभ्यास करून त्यांच्यातील गुण आचरणात आणण्याची गरज आहे.’ असे सांगून डॉ. रोंगे यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे महत्व स्पष्ट केले. या दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील आरती व ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या पोवाडयाचे गायन झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व अफजलखान यांच्या आग्रा भेटीचे नाटक वेशभूषेसह सादर केले. आकर्षक शिवमूर्ती बरोबर विद्यार्थी सेल्फी घेत होते आणि शिवचरित्राचा महिमा सांगणारी गीते कॅम्पसमध्ये ऐकू येत होती. याप्रसंगी स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज व प्रशासन अधिष्ठाता डॉ.मिलिंद कुलकर्णी, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती, डॉ. सुभाष जाधव यांच्यासह सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. गुरुराज इनामदार यांनी सूत्रसंचालन केले तर प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा.करण पाटील यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments