Pandharpur Live News : पोलिसांनी चोराला पकडलं हे काय नवीन नाही. पण ते त्याला कशा पद्धतीने पकडतात तो मात्र चर्चेचा विषय असतो. चीनमधली एक घटना खूप व्हायरल (Viral) झालीये.
मेलेल्या डासामुळे पकडले
चीनमध्ये पोलिसांनी चोराला 19 दिवसांनी तेही चक्क मेलेल्या डासामुळे पकडले. घरफोडी झालेल्या घरात दोन मृत डास सापडले, भिंतीवरील रक्ताचे डाग वापरून डीएनएद्वारे पोलिसांनी चोराला शोधून काढले. पोलिसांनी पुराव्यासाठी घराची कसून तपासणी केली तेव्हा त्यांना घराच्या लिव्हिंग रुमच्या भिंतीवर दोन मृत डास व रक्ताचे डाग आढळून आले. डासांच्या रक्ताचे थेंबही बाहेर आले होते. पोलिसांनी ते रक्ताचे नमुने घेऊन डीएनए चाचणीसाठी पाठवले.
घरातच एक रात्र काढली
रिपोर्टनुसार, 1 जून रोजी फुझियान प्रांतातील फुझोऊ येथे घरफोडीची घटना घडली होती. चोरट्याने तेथून लाखो किमतीच्या अनेक मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला. पोलीस आल्यावर घराचा दरवाजा आतून बंद असल्याने चोर बाल्कनीतूनच घरात घुसल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. चोराने त्याच घरात एक रात्र घालवल्याचा अंदाजही पोलिसानी व्यक्त केला; कारण स्वयंपाक घरात उरलेले नूडल्स आणि अंड्यांचे कवच आढळले. तसेच, घराच्या मालकाच्या बेडरूममध्ये ब्लॅकेटचा वापर केल्याचेही लक्षात आले.
डासच पोलिसासाठी उपयुक्त ठरले
डीएनए चाई नावाच्या एका गुन्हेगाराशी जुळले, लगेच पोलिसांनी चाईला 30 जून रोजी ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीनंतर चाईने अपार्टमेंटमधील घरफोडीसोबतच इतर चार चोरीचीही कबुली दिली. पोलिसांनी सांगितले की, दोन्ही डासांनी चोराचा चावा घेतला आणि त्याचे रक्त प्यायले, त्यानंतर चोरट्याने त्यांना ठार केले, अशात ते डासच पोलिसासाठी उपयुक्त ठरले आणि 19 दिवसानी आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले, सोशल मीडियात सध्या ही घटना चर्चेत आहे.
0 Comments