Pandharpur Live :
स्मार्ट PHC
नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने ग्रामीण भागात महत्त्वाचे असलेले स्थान म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र. या आरोग्य केंद्रात आसपासच्या पंचक्रोशीतील हजारो नागरिक उपचार घेत असतात. आर्थिकदृष्ट्या परवडेल अशी व्यवस्था त्याठिकाणी असते. ही आरोग्य केंद्रे अधिकाधिक सक्षम व स्मार्ट होणे गरजेचे आहे. आरोग्य संस्थांमध्ये नैसर्गिक समतोल राखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या उद्देशाने स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियान राबविण्यात येत आहे. हे करताना भौतिक सुविधांमध्ये बदल करणे, अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण व सक्षमीकरण करणे व नियमावली नुसार शिष्टाचार सेवा प्रदान करणे यावर भर देण्यात येणार आहे. त्याविषयीचा हा लेख... |
सर्व नागरिकांना उच्च दर्जाचा आरोग्यस्तर प्राप्त करुन देणे राष्ट्रीय आरोग्य विषयक 2017 च्या धोरणानुसार क्रमप्राप्त आहे. या धोरणानुसार सार्वजनिक आरोग्य सेवेचा दर्जा उंचविला तर नागरिकांना मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा प्राप्त करुन घेता येतील. त्यामुळे सर्वत्र प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत दर्जेदार व गुणवत्तापूर्व सर्वसमावेशक सेवा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट करण्याची संकल्पना राबविण्यात येत आहे.
स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये भौतिक पायाभूत सुविधा, मनुष्यबळ, संदर्भसेवा, माहिती व तंत्रज्ञानाचा वापर व पर्यावरण संतुलित प्राथमिक आरोग्य केंद्र या बाबींचा समावेश असणार आहे. रुग्णसेवा दर्जेदार होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील पायाभूत सुविधांमध्ये एकसमान बदल करणे, आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी जनतेचा सहभाग वाढविणे, आरोग्य संस्थांमधील उपलब्ध यंत्र व साधनसामुग्री रुग्णसेवेसाठी अद्ययावत करण्यात येणार आहेत.
पायाभूत सुविधा
पायाभूत भौतिक सुविधांमध्ये विविध मानांकनानुसार, विविध कक्षामध्ये बदल करणे, सोलर एनर्जीचा वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, आयुष-हर्बल गार्डन, रुग्ण अनुकूल वातावरण या बाबींचा समावेश असेल. दर्जेदार रुग्णसेवेसाठी आवश्यक साधनसामग्री, रुग्णालयातील साधनसामग्रीचे नियमावली नुसार देखभाल करणे, तसेच मनुष्यबळाचे विविध प्रशिक्षणाद्वारे सक्षमीकरण (सॉफ्टवेअर व टेक्निकल) या अभियानाद्वारे करण्यात येणार आहे.
भौतिक सुविधा
प्रसुतिगृह, शस्त्रक्रियागृह, बाह्य रुग्ण विभाग, आंतर रुग्ण विभाग, प्रयोगशाळा, औषध भांडार, संगणक कक्ष, सोलर उर्जा वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्वागत कक्ष, अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत, परिसर सुशोभिकरण, आयुष गार्डन, कॅटल ट्रॅप व प्रसाधनगृह या भौतिक सुविधा अपेक्षित आहेत. यामध्ये स्मार्ट प्रसुतीगृह अत्याधुनिक लेबर टेबल, अत्याधुनिक शॅडोलेसर लॅम्प, कॅबिनेट फॉर औषधे व सामग्री, इन्स्ट्रुमेंट ट्रॉली, बेबी वॉर्मर, सक्शन मशिन, स्ट्रेचरल विथ ट्रॉली, व्हिल चेअर व स्वतंत्र प्रसाधनगृह अशा सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
अत्याधुनिक ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, ट्युबेकटॉमी किट, स्टरलायजेशन संच तसेच शस्त्रक्रियागृहामध्ये अँटीमायक्रोबियल (प्रतिजैविक) पॅनेलचा वापर, अत्याधुनिक तापमान व आद्रता नियंत्रणप्रणाली शस्त्रक्रिया गृहात उभारण्यात येणार आहे. कलरी मिटर, ग्लुको मिटर, बायनाक्युलअर मायक्रोस्कोप, आऊटसोरसिंग लॅब (एचएलएल), तपासणीसाठी लागणारे रसायने व द्रव्य यांची उपलब्धता व पुरवठा यावर ई-औषधीसारख्या तंत्रज्ञानाद्वारे नियंत्रण ठेवले जाणार आहे. या प्रयोगशाळेत टी.बी., डेंग्यु, मलेरिया, बायोमिस्ट्री व हिमॅटॉलॉजी या प्रकारच्या तपासण्या केल्या जाणार आहेत.
एकसारखे सेमी फाऊलर बेड, मॅट्रेससह, एकसमान नर्सिंग स्टेशन, स्वतंत्र सुसज्ज आल्हाददायी वातावरण, एकसमान बेड साईड लॉकर, एकसारखे दोन बेडमधील पडदे व एकसारखे दिवसनिहाय स्वच्छ व आकर्षक बेडशिट, स्वतंत्र व स्वच्छ प्रसाधनगृह याद्वारे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियानांतर्गत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अत्याधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.
जनसहभाग वाढविणे
आरोग्य सेवामध्ये जनतेचा सहभाग वाढविण्यात येणार आहे. सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत जनसहभाग वाढविण्यासाठी रुग्ण व नातेवाईकांचे अभिप्रायानुसार आरोग्य सेवा पुरविणे, जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद स्वनिधी, सीएसआर, राष्ट्रीय आरोग्य अभियान, स्थानिक विकास निधी, सेवाभावी संस्था, 15 वा वित्त आयोग व लोकसहभाग या माध्यमातून भौतिक सुविधा परिपूर्ण करण्यात येणार आहेत. सर्व स्तरांवरील घटकांचा या अभियानामध्ये समावेश झाल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत निश्चितच पोहोचेल.
00000
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय सातारा



0 Comments