महाराष्ट्र साखर आयुक्तालयाने विकसित केले ऊस नोंदणीसाठी आता स्वतंत्र ॲप ; ऊसतोडीचे झंझट संपणार !

 Pandharpur Live Online : औरंगाबाद : साखर कारखान्याकडे बिगरनोंदणी असलेल्या उसाची नोंदणी शेतकऱ्यांना आता थेट साखर आयुक्तालयाकडे करता येणार आहे. यासाठी साखर आयुक्तालयाने स्वतंत्र ऊस नोंदणी ॲप विकसित केले असल्याची माहिती साखर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी दिली. यामुळे औरंगाबाद विभागासह एकूणच राज्यातील उसाचे क्षेत्र कळण्यास मदत होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

उस लागवड केली. पण, त्या लागवडीची नोंदणी सहकारी साखर कारखान्याकडे केली नाही, म्हणून उसाची तोडणीच होऊ शकली नाही. यामुळे ऊस लागवडीचा आणि जोपासण्याचा खर्च पाण्यात गेला आणि या उसापासून मिळणारे आर्थिक उत्पन्नही बुडाले, अशी अवस्था ही उसाची रीतसर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची होत असते. याला उपाय म्हणून राज्याच्या साखर आयुक्तालयाने पुढाकार घेतला आहे

उसाचे अचूक क्षेत्र कळणार
राज्यातील अनेक शेतकरी उस लागवडीची रीतसर नोंदणी करत नाहीत. त्यामुळे राज्यात बिगर नोंदणी केलेला ऊस किती, याचा अंदाज येत नाही; परंतु यावर मार्ग काढण्यासाठी साखर आयुक्तालयाच्या वतीने स्वतंत्र अॅप विकसित केले आहे. त्यावर शेतकरी घरबसल्या उस लागवडीची नोंदणी करू शकणार आहेत. परिणामी साखर कारखान्याकडे नोंदणी नसलेल्या बिगर नोंदणी उसाची नोंदणी या अॅपवर होणार आहे. परिणामी राज्यातील उसाचे अचूक क्षेत्र कळण्यास मदत होईल.



– शिवनाथ स्वामी, प्रादेशिक साखर उपसंचालक

आठवडाभरात चाचणी
ॲपच्या निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे. त्याची आता चाचणी केली जात आहे. ही चाचणी येत्या आठवडाभरात पूर्ण होईल. या चाचणीत आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता केली जाणार आहे. त्रुटींची पूर्तता केल्यानंतर हे अॅप कार्यान्वित केले जाणार आहे. या अॅपच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकरी हे घरबसल्या त्यांच्या उसाची नोंदणी करू शकणार आहेत. शिवाय साखर कारखान्याकडे उसाची नोंदणी नसली तर साखर आयुक्तालयाकडे मात्र नोंदणी होणार असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments