डोंबिवली पश्चिमेतील कोपरगावमधील एका मध्यमवर्गीय सोसायटीत राहणाऱ्या उच्चशिक्षित विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. किरण भूषण पाटील (२४) असे पीडित विवाहितेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरणने मास्टर ऑफ फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले आहे. भडगाव येथे तिचे माहेर आहे. डिसेंबर २०२१ मध्ये किरणचे डोंबिवलीत राहणाऱ्या भूषण पाटील यांच्याबरोबर लग्न झाले. भूषण, सासू सुनीता, नणंद दीपाली आणि विवाहिता किरण हे डोंबिवलीत कोपर गावमध्ये एकत्र राहतात. कुटुंबियांनी सुरुवातीला किरणला चांगली वागणूक दिली. त्यानंतर कुटुंबीय किरणकडे 'तू माहेरहून २० लाख रुपये घेऊन ये. आपल्याला डोंबिवली पूर्वेत सदनिका घ्यायची आहे' असा तगादा लावत होता. तसेच धमकीही देण्यात आली होती. मात्र, किरणच्या माहेरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे तेवढे पैसे मी आणू शकत नाही असे किरण सारखं सासरच्या लोकांना सांगत होती. या कारणावरुन किरणला घरात सतत मारहाण सुरू होती.
गेल्या शुक्रवारी किरण अंधेरी सीप्झ येथे एका कंपनीत मुलाखत असल्याने सकाळीच जाण्याची तयारी करत होती. त्यावेळी पती भूषण, सासू सुनिता यांनी मुलाखतीला जायचे नाही असे बोलून किरणला दोघांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू होताच त्यात नणंद दीपाली हिने किरणला आपण ठार मारून टाकू आणि तिने आत्महत्या केली आहे असे दाखवून देऊ असे म्हणत तिनेही किरणला मारहाण केली. सासू सुनिताने पर्सचा चामडी पट्टा काढून किरणच्या गळ्याला आवळून तिला फास लावून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
तिघांनी एकावेळी हल्ला केल्याने किरण एकाकी पडली. अखेर कशीबशी सुटका करुन घेत किरणने बेडरुमध्ये धाव घेतली आणि खोलीचा दरवाजा आतून लावून घेतला. किरणने तात्काळ वडिलांना फोन करत सगळा प्रकार सांगितला. वडिलांनी कळवा येथे राहणारा त्यांचा चुलत भाऊ शुभम भोसले याला तातडीने किरणच्या डोंबिवलीतील घरी जाण्यास सांगून तिला त्याच्या घरी घेऊन येण्यास सांगितले. शुभमने डोंबिवलीत येऊन किरणला स्वत:च्या घरी नेले. त्यानंतर किरणचे वडील, भाऊ भडगाव येथून किरणला आपल्या घरी घेऊन गेले. बेदम मारहाणीत जखमी झालेल्या किरणवर भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.




0 Comments