दांडियाने घेतले ५ बळी , तरुणांनो हृदय सांभाळा

 रुणांनो, गरबा खेळताय? पण जरा दमानं. कारण दांडिया खेळताना दोन दिवसांत तब्बल पाच तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वसई, मुलुंड, वाशिम तसेच गुजरातच्या तारापुरात मृत्यूने हा 'फेर' धरला असून जीव गेलेले सर्व जण 25 ते 30 वयोगटातील आहेत.


त्यामुळे नवरात्रोत्सवातील आनंदाच्या रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून सावधान… आधी तुमचे हृदय सांभाळा… मगच बेधुंद होऊन टिपऱ्यांच्या तालावर रास गरबा खेळा!

संपूर्ण देशभरात नवरात्रोत्सवात तरुणाईचा उत्साह टिपेला पोहोचला आहे. शाळा, कॉलेज तर कोणी दिवसभर काम-व्यवसायातून घरी परतल्यानंतर थोडा विरंगुळा म्हणून प्रत्येकाचीच पावले या उत्सवात आपोआपच गरब्याच्या तालावर थिरकतात. मात्र गरबा खेळताना गेल्या दोन दिवसांत पाच जणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. डोंबिवली येथे राहणारा वृषभ भानुशाली (27) हा मुलुंडच्या कालिदास नाटय़गृहात गरबा खेळण्यासाठी गेला होता. काही वेळ दांडिया खेळल्यानंतर त्याच्या छातीत अचानक दुखू लागले. नातेवाईकांनी त्याला तत्काळ आदिती रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्याच्यावर काळाने झडप घातली होती. यापाठोपाठ विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथील एव्हर शाईन अवेन्यू इमारतीत गरबा खेळताना मनीष जैन (35) याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. वाशिम जिह्यातही वाशीम येथे गोपाल इन्नानी (30) व कारंजा शहरातील सुनील काळे गरबा खेळताना मैदानावरच भोवळ येऊन कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर गुजरातमधील तारापूर गावातील शिवशक्ती सोसायटीत वीरेंद्र राजपूत या तरुणाला दांडिया खेळताना हृदयविकाराचा झटका आला.


अनेक जण व्यायामाची कोणतीही सवय नसताता अचानकपणे भावनेच्या भरात टिपऱ्या खेळायला सुरुवात करतात. त्यावेळी मोठय़ा डेसिबलमध्ये डिजेदेखील सुरू असतो. एकीकडे सराव न करता जोरजोरात दांडिया खेळला जातो. हृदयाचे ठोके वाढतात. डिजेचा आवाज मोठा असल्याने त्याचाही हृदयावर ताण पडतो. हा ताण तणाव सहन न झाल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे पूर्ण प्रॅक्टीस केल्यानंतरच हौशी लोकांनी दांडिया खेळावा.

Post a Comment

0 Comments